
पाकिस्तानकडून सातत्यानं सीमेवर कुरापती सुरू आहेत. आताही त्यांनी पंजाबच्या गुरुदासपूर इथं पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
अमृतसर - पाकिस्तानकडून सातत्यानं सीमेवर कुरापती सुरू आहेत. आताही त्यांनी पंजाबच्या गुरुदासपूर इथं पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. रात्री सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली टिपण्यात आल्या होत्या. त्यावेळी सुरक्षा दलाने 18 राउंड फायर करून ड्रोनला परतवून लावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शोध मोहीम राबवल्यानंतर 11 पाकिस्तानी ग्रेनेड सापडली आहेत.
याबाबत चंदिगढमध्ये पंजाबचे DIG दिनकर गुप्ता किंवा इतर अधिकारी पत्रकार परिषदेत माहिती देण्याची शक्यता आहे. गुरुदासपूरमधील दीनानगर भागात असलेल्या स्लाच गावात हा प्रकार घडला आहे. याठिकाणी ऑब्जर्व्हिंग पोस्ट असलेल्या भागात शनिवारी रात्री पाकिस्तानकडून आलेल्या एका ड्रोनवर भारताच्या सीमा सुरक्षा दलाने 18 राउंड फायर केले. त्यानतंर ड्रोन पाकिस्तानच्या बाजुने गेला होता.
बीएसएफचे DIG राजेश शर्मा यांनी सांगितलं की, 58 बटालियनच्या जवानांनी ड्रोन दिसताच गोळीबार सुरू केला. रविवारी पोलिसांच्या पथकाने सीमेवर शोधमोहीम राबवली. सीमेवर गोंधळ निर्माण करून अंमली पदार्थ आणि हत्यारं पाठवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. बीएसएफकडून मात्र ग्रेनेड सापडल्याबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अमृतसरसह राज्यातील अनेक जागांवर भारत पाकिस्तान सीमेवर ड्रोन आल्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी पंजाबमध्ये सीमा क्षेत्रात शस्त्रे आणि हेरॉइन सापडले आहे.
हेही वाचा- ''भाजपला मते द्याल तर, रक्ताचे पाट वाहतील''; पश्चिम बंगालमधील भिंतीवर धमकी
याआधी अमृतसरमध्ये ड्रोनसह दोघांना अटक करण्यात आली होती. यात असा खुलासा झाला होता की, भारतासुद्धा अवैध पद्धतीने ड्रोन तयार केले जात आहेत. दिल्लीतील दोन तरुणांना अटक करण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडून ड्रोन तयार करण्यासाठीचं साहित्यही जप्त केलं आहे.