पालकांनो, मुलांचे ‘रोजचे हिरो’ बना! 

Sachin-Tendulkar
Sachin-Tendulkar

बहुपैलू क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने स्वातंत्र्यदिनानिमित्त खास ‘सकाळ’च्या वाचकांसाठी साधलेला संवाद. कोरोनामुळे स्वतःचा धीर खचू न देता, समंजसपणा आणि परिपक्वता दाखवून मुलांचे खरे हिरो बनण्याबाबत त्याने पालकांना दिलेला कानमंत्र... 

आज स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतो आहे. या निमित्ताने मनात आलेले विचार तुमच्यासमोर मांडतो आहे. मला माझ्या लहानपणीची एक आठवण मनात येत आहे. आम्ही सगळेजण टीव्हीवर एकत्र सिनेमा बघत होतो. सिनेमात काही हिंसक दृश्ये होती- जी चालू झाली, की माझी आई माझ्या डोळ्यांवर घट्ट हात ठेवायची. मला ती दिसू नयेत म्हणून. मग व्हायचे काय, की माझी उत्सुकता अजून वाढायची आणि मी आईचा हात दूर करायचा निष्फळ प्रयत्न करायचो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या पाल्यावर कोणतेही चुकीचे किंवा निराशाजनक विचार कोरले जाऊ नयेत म्हणून पालक अशी कृती आपसूक करतात. विज्ञानाने सिद्ध केले आहे, की लहान वयात जे अनुभव मिळतात, त्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या जडणघडणीवर होतो. हे खास करून पहिल्या सहा वर्षांत जास्त असते- जेव्हा मेंदूची प्रगती झपाट्याने होत असते. मुले मोठी झाल्यावर निरोगी आणि आनंदी राहणार का याचा जणू हा पाया ठरतो. विज्ञानाने हेसुद्धा स्पष्ट केले आहे, की लहान वयात झालेले चुकीचे निराशाजनक संस्कार मुलांच्या भावनिक जडणघडणीवर नकारात्मक परिणाम करतात. 

आत्ताच्या घडीला जगाला महासाथीने ग्रासलेले आहे. एकंदरीतच वातावरणात थोडीशी भीती आणि अनिश्‍चितता आहे. मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे कुटुंबे घरात कोंडली गेली आहेत. हालचालींवर मर्यादा आहेत. कोणाचा पगार कापला गेला आहे, तर कोणाच्या नोकरीलाच धक्का लागला आहे. कमी उत्पन्नात घरात बसून काम करणे जिकीरीचे व्हायला लागले आहे. या सगळ्यांचे दडपण साहजिकच पालकांवर येते आहे. मात्र, मला वाटते हीच वेळ आहे मन कणखर करायची- कारण पालकांवर मुलांना सांभाळायची मोठी जबाबदारी आहे. हीच वेळ आहे पालकांनी खंबीरपणे उभे राहायची आणि संकटाशी धैर्याने सामना करत या परिस्थितीचा कोणताही विपरीत परिणाम मुलांवर होऊन न द्यायची. हीच वेळ आहे ‘सकारात्मक पालक’ बनण्याची. 

माझी मुले वाढत असल्याने मीसुद्धा तुमच्यासारखाच एक पालक आहे. ही आपली जबाबदारी आहे विचारांनी सकारात्मक राहण्याची,मुलांचा हात पकडून त्यांना योग्य मार्गावर न्यायची. जागतिक संकटाला सामोरे जाताना संयम अंगी कसा बाणवायचा याचे उदाहरण कृतीतून दाखवण्याची. आपल्या सगळ्यांना जास्त काळ घरात राहावे लागत आहे, मग त्याचा उपयोग करून मुलांशी संवाद साधून त्यांना योग्य विचार करायला लावायची ही संधी आहे. आपण आपले विचार सतत न लादता त्यांना मन मोकळे करून बोलायला प्रोत्साहन द्यायला हवे. जर चुकून तुमच्या मुलाने किंवा मुलीने एकदम राग व्यक्त करून चुकीचे बोलण्याची कृती केली, तर आपण एक सेकंद शांत राहून मगच प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. कदाचित असे चुकीचे वागताना मुले आपली भीती, नैराश्‍य, पुढे काय होणार याची अनिश्‍चितता बोलून व्यक्त करत असतील. अशा भावना मोकळेपणाने मांडायला त्यांना दुसरे ठिकाण नसते हे लक्षात घेतले पाहिजे आपण. अद्वातद्वा बोलून किंवा कोणतीतरी भयानक शिक्षा करून आपण राग काढता कामा नये हे नक्की.

मुलांना कोविड -१९ बद्दल शंका असल्या, तर त्यांची आकलनक्षमता ओळखून त्यांचे निरसन करायचा प्रामाणिक प्रयत्न आपण करायला हवा. त्यांना योग्य प्रश्‍न विचारणे जमत नसले, तरी आपण ते सोप्या भाषेत समजावले पाहिजे. त्यांनी परत परत तेच ते विचारले तरी संयम राखून त्यांना समजावले पाहिजे- ज्याने त्यांचा विश्‍वास वाढेल. समजा आपल्याकडे योग्य उत्तर नसेल, तर वाट्टेल ते उत्तर देऊ नका. उलट योग्य ज्ञान घ्या आणि मगच उत्तर द्या. लक्षात घ्या, तुमच्या-माझ्यासारखे लाखो पालक सध्या याच संघर्षातून जात आहेत. शांत आणि मानसिकदृष्ट्या स्थिर पालक असणे हे मुलांकरता फार फार मोलाचे असते. 

शांतपणे बोलणे ऐकणे, कधीतरी पाठीवर थाप मारणे, मुलांना मिठीत घेणे या गोष्टी मुलांच्या वाढीकरता ते चांगले सुजाण, समंजस नागरिक घडण्यात मोठे काम करून जातात. कोणतीही मुले ही आपल्या आई-वडिलांकडेच आदर्श म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून बघत असतात. बाहेरील जगात काहीही उलथापालथ होत असली, तरी त्यांच्याकरता पालक हेच आदर्श आणि हिरो असतात. तुम्ही ते मिरवत नसलात, तरी तुम्हीच ‘रोजचे हिरो’ असता हे कायम ध्यानात ठेवा. 

परत एकदा तुम्हा सगळ्यांना स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद! 

तुमचा, 
सचिन तेंडुलकर 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com