Positive Story - रुग्ण ठरला डॉक्टरांसाठी देवदूत; कोरोनामुक्त झाल्यानंतर केलं प्लाझ्मा दान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

एका डॉक्टरचा जीव वाचवण्यासाठी रुग्ण धावून आल्याची घटना घडली आहे. कोरोनाचा संसर्ग झाला असताना ज्या डॉक्टरांनी उपचार केले होते त्याच डॉक्टरांसाठी कोरोनामुक्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाने प्लाझ्मा दान केलं आहे.

मेरठ - चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाने भारतातही हाहाकार माजवला. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी दिवाळीनंतर दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात देशात अनेक प्रेरणादायी आणि संवेदनशिल प्रसंग बघायला मिळाले. माणुसकीच्या नात्याने लोकांनी एकमेकांना संकटात मदतीचा हात दिला. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मेरठ इथं घडली आहे. एका डॉक्टरचा जीव वाचवण्यासाठी रुग्ण धावून आल्याची घटना घडली आहे. कोरोनाचा संसर्ग झाला असताना ज्या डॉक्टरांनी उपचार केले होते त्याच डॉक्टरांसाठी कोरोनामुक्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाने प्लाझ्मा दान केलं आहे.

आनंद रुग्णालयातील डॉक्टर अनिल तालियान यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांचा जीव वाचवण्यासाठी एका रुग्णाने प्लाझ्मा दान केलं. यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल असं रुग्णालयातील डॉक्टरांनी म्हटलं आहे. साकेत इथं राहणाऱ्या पंकज गोयल यांना 24 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 31 ऑगस्टला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पंकज गोयल आणि त्यांची पत्नी रुग्णालयात दाखल झाले होते. 

हे वाचा - Fact Check - भारतात 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असा व्हायरल मेसेजमध्ये दावा

रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनातून बरे झालेल्यांचा एक व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला आहे. दोनच दिवसांपूर्वी या ग्रुपमद्ये रुग्णालयाचे फिजिशियन डॉक्टर अनिल तालिया यांच्यासाठी बी पॉझिटिव्ह प्लाझ्मा हवी असल्याची माहिती पोस्ट करण्यात आली होती. पंकज गोयल यांच्यावर डॉक्टर तालिया यांनीच उपचार केले होते. व्हॉटसअॅप ग्रुपवर मेसेज पाहताच पंकज गोयल यांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली.

वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गोयल यांच्या शरीरात योग्य प्रमाणात अँटिबॉडी असल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉक्टरांनी एक युनिट प्लाझ्मा घेऊन डॉक्टर तालियान यांच्यावर उपचार केले. एखाद्या रुग्णामध्ये जर अँटिबॉडीज असतील तर त्याने इतरांचा जीव वाचवण्यासाठी पुढे यायला हवं असं डॉक्टर सुभाष यादव यांनी सांगितलं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: patient donate plaze for doctor who give treatment in corona