भारताने पाकिस्तानसोबत पुन्हा चर्चा सुरु करावी; मेहबुबांच्या सल्ल्यावरुन नेटकरी संतापले

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 14 November 2020

मेहबुबा मुफ्ती यांच्या सल्ल्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे

श्रीनगर- भारत आणि पाकिस्तान यांनी राजकीय अडथळे बाजूला करुन पुन्हा नव्याने संवाद सुरू करावा, असा सल्ला पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर बेछुट गोळीबार केला. यात सीमाभागातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला तसेच पाच जवान हुतात्मा झाले. यावेळी भारताने दिलेल्या चोख प्रत्त्युरात पाकिस्तानचे आठ सैनिक मारले गेले.

सीमेवरचा ताण कमी करण्यासाठी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी लागू केलेल्या शस्त्रसंधीची पुन्हा अंमलबजावणी करावी, असे आवाहन मेहबुबा यांनी केले. नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूंनी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पाहून मी निराश झाले आहे. भारत आणि पाकिस्तानने आपले राजकीय अडचणी बाजूला ठेवून चर्चा सुरू करायला हवी आणि वाजपेयी व मुशर्रफ यांनी लागू केलेली शस्त्रसंधी पुन्हा अंमलात आणावी, असे आवाहन मेहबुबा यांनी केले आहे. दरम्यान, मेहबुबा मुफ्ती यांच्या सल्ल्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर परत मिळवण्यासाठी आपल्याकडे काही कल्पना आहे का? अशी विचारणा एका यूजरने केली आहे.

अभिमानास्पद! जगभरातील टॉप वैज्ञानिकांच्या यादीत 36 भारतीय

कमकुवत धोरण आणि भितीपोटी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दिवाळीसारख्या सणातही आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे जवान सीमेचे रक्षण करण्यास जीवाची बाजी लावत आहेत. पाकिस्तानचे नापाक इरादे मोडून काढत आहेत. लष्करातील प्रत्येक जवानाला माझा सलाम, असं कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pdp mehbuba mufti said india should talk with pakistan