मास्कविना फिरणाऱ्यांनो, आता चौपट दंड होणार; दिल्लीची कोरोनाची स्थिती गंभीर!

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 19 November 2020

लस येत नाही तोवर कोविड-१९ विषाणूपासून लढण्यासाठी अत्यावश्‍यक त्या आरोग्य त्रिसूत्रीच्या पालनाकडे दिल्लीत अनेक जण सर्रास दुर्लक्ष करताना आढळत आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीत यापुढे कोणी मास्कविना फिरताना आढळल्यास त्यांना सध्यापेक्षा चौपट जास्त म्हणजे २००० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (ता.१९) ही घोषणा केली. यापूर्वी दंडाची रक्कम ५०० रुपये होती. दरम्यान, छटपूजेवरून राजकारण करू नका, असेही आवाहन केजरीवाल यांनी विरोधकांना केले.

'नितीशजी, खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात'; तेजस्वीने चढवला हल्ला

कोरोना काळात वारंवार इशारे देऊनही मास्क न लावताच बिनदिक्कत बाहेर फिरणाऱ्यांना चाप लावण्यासाठी दिल्ली सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. यंदाच्या दिवाळीत राजधानीतील बाजारपेठांमध्ये एकच गर्दी उसळली व ऐन दिवाळीतच कोरोनाने दिल्लीवर पुन्हा हल्ला चढविला. गेले आठवडाभर नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या ७ ते ८ हजारांच्या व दररोजच्या मृतांची संख्या शंभराच्या वर घरात गेली आहे. या महामारीने दिल्लीत अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याचे चित्र असून परिस्थिती सुधारली नाही, तर नजीकच्या काळात पुन्हा मिनी लॉकडाउन लावण्याशिवाय सरकारकडे गत्यंतर नसेल असे दिसत आहे.

बिहारमध्ये नितीश सरकारला धक्का; नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा

लस येत नाही तोवर कोविड-१९ विषाणूपासून लढण्यासाठी अत्यावश्‍यक त्या आरोग्य त्रिसूत्रीच्या पालनाकडे दिल्लीत अनेक जण सर्रास दुर्लक्ष करताना आढळत आहेत. विशेषत: मास्क न वापरणे, मास्कऐवजी नुसताच रुमाल किंवा उपरणे कसेबसे गुंडाळणे असे प्रकार करणाऱ्यांची मोठी संख्या दिसत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने मास्क न लावल्याबद्दलचा दंड थेट चौपटीने वाढवून तो २००० रुपये केला आहे. सरकारने नायब राज्यपालांसह मिळून हा निर्णय घेतल्याचेही केजरीवाल यांनी नमूद केले.

अच्छे दिन की 'दीन'? अर्थव्यवस्थेत गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण; उत्पादन क्षेत्र रसातळाला​

छटपूजा घरीच करण्याचे आवाहन
छटपूजेवरून दिल्लीत राजकारण सुरू आहे. केजरीवाल यानी, केवळ आरोग्याच्या कारणावरून व जीव वाचविण्यासाठीच सरकारने व्यापक पातळीवर छटपूजेला यंदा परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले. उच्च न्यायालयानेही, जिवंत रहाल तरच सण साजरे कराल, असे सांगून दिल्ली सरकारच्या निर्णयाला पाठबळ दिले होते. केजरीवाल यांनी यावर्षी छटपूजा घरीच करण्याचे आवाहन केले.

छटपूजेसारख्या उत्सवांना केजरीवाल सरकारने परवानगी नाकारल्यावरून दिल्ली भाजपने आंदोलने सुरू केली आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी काल केजरीवाल यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केला होता. केजरीवाल यांनी कोणाचा नामोल्लेख न करता, यावरून राजकारण करू नये असे आवाहन केले.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Penalty for not wearing mask in Delhi raised from Rs 500 to Rs 2000 CM Kejriwal declared