'नितीशजी, खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात'; तेजस्वीने चढवला हल्ला

Bihar_Tejashwi_Nitish
Bihar_Tejashwi_Nitish

पटना : बिहारचे वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मेवालाल चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विरोधी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फक्त तीन दिवसांतच बिहारचे नवे शिक्षणमंत्री चौधरी यांनी राजीनामा द्यावा लागला. यामुळे विरोधी पक्षाला नितीशकुमारांवर टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे.

तेजस्वी यांनी नितीशकुमारांवर टीका करताना म्हटले आहे की, ''नितीशकुमारांची विचार करण्याची आणि एखादी गोष्ट समजण्याची क्षमता क्षीण होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्या भ्रष्ट धोरणांबद्दल त्यांना चेतावणी देण्याचे राजदचे काम आहे. 'माननीय मुख्यमंत्री, जनादेशाच्या माध्यमातून बिहारने आपल्या भ्रष्ट धोरण, हेतू आणि नियमाविरूद्ध तुम्हाला चेतावणी दिली आहे. केवळ राजीनामा देण्याने काही होणार नाही. १९ लाख नोकऱ्या आणि समान काम-समान वेतनसारख्या सामाजिक चिंतेच्या अनेक विषयांवर पुन्हा भेटत राहू. जय बिहार, जय हिंद.''

तेजस्वी यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मी म्हणालो होतो, तुम्ही थकत चालले आहात. त्यामुळे तुमची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी झाली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना जाणीवपूर्वक मंत्री केले. इतकी टीका झाली तरीही पदभार स्वीकारला आणि काही तासांनंतर राजीनाम्याचे नाटक केले. खरे गुन्हेगार तर तुम्ही आहात. तुम्ही मंत्री का केले? तुमची नौटंकी यापुढे चालणार नाही.'

मेवालाल यांच्या नियुक्तीबरोबरच नितीशकुमार यांच्या नव्या सरकारवर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. मेगालाल यांच्यावर २०१७मध्ये भागलपूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असताना सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ वैज्ञानिक पदाच्या नेमणूकांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र, अजूनही त्यांच्याविरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. बिहारचे तत्कालीन राज्यपाल आणि सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फौजदारी खटला चालविण्याची परवानगी दिली होती आणि भाजपने विशेषत: विरोधी पक्षनेते सुशील मोदी यांनी चौधरी यांच्या अटकेची मागणी केली होती.

विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपामुळे गदारोळ उठल्यानंतर पक्षाने चौधरी यांना पक्षातून काढून टाकले होते; पण दिवस फिरले तसे ज्या पक्षातून काढून टाकले होते, त्यांनी पुन्हा पक्षात घेत त्यांना शिक्षणमंत्रीही बनवले. मात्र, आता पुन्हा एकदा सर्व बाजूंनी दबाव वाढल्यानंतर मेवालाल चौधरी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

- इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com