पेट्रोल दरवाढीची चिंता; पंतप्रधान मोदींनी तेल उत्पादक देशांना दिला सल्ला

टीम ई सकाळ
Thursday, 18 February 2021

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून पेट्रोलनं काही राज्यात शंभरी गाठली आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल आयात करणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली - देशातील पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून पेट्रोलनं काही राज्यात शंभरी गाठली आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल आयात करणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने सौदी अरब आणि इतर कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपातीत घट करण्याची मागणी केली आहे. भारताने म्हटलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्यानं इकॉनॉमिक रिकव्हरी आणि मागणी यामध्ये फटका बसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात म्हटलं की, भारतासारखा विविधता असलेल्या आणि प्रतिभावान देश इंधनासाठी आयातीवर इतका अवलंबून कसा काय राहू शकतो?

तामिळनाडूतील तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मोदींनी पेट्रोल दरवाढीवर वक्तव्य केलं. आधीच्या सरकारने देशाचे तेल आय़ातीवर असलेल्या अवलंबित्व कमी केलं असतं तर याचा भार मध्यमवर्गीयांवर पडला नसता असं म्हणत पेट्रोल दरवाढीचं खापर मोदींनी आधीच्या सरकारवर फोडलं आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं की, पुढच्या काही महिन्यांपर्यंत तेलाच्या किंमती ऐवजी मागणी वाढवण्यावर जोर द्यायला हवा. 

हे वाचा - सलग 10 व्या दिवशी इंधन दरवाढ; पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा नवा उच्चांक

इथेनॉलच्या उत्पादनाकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशाच्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करण्यात आलं होतं. तर फक्त 53 टक्के गॅस आयात केला होता. जर ही आयात कमी करण्याच्या दिशेनं प्रयत्न आधीच केले गेले असते तर आज सर्वसामान्य लोकांवर याचा भार पडला नसता. तसंच केंद्र सरकार मध्यमवर्गीयांबाबत संवेदनशील आहे. यासाठीच पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवण्यावर लक्ष दिलं जात आहे.

अक्षय उर्जेवर काम
इथेनॉल ऊसापासून मिळवलं जातं. यामुळे तेलाच्या आयातीचं प्रमाण कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल. मोदी म्हणाले की, केंद्र सरकार एनर्जी इम्पोर्ट डिपेंडन्स कमी करण्यावर काम करत आहे. याशिवाय अक्षय उर्जेवरही काम केलं जा असून 2030 पर्यंत अक्षय उर्जेचं देशाच्या एकूण उर्जेच्या उत्पादनात जवळपास 40 टक्के इतकं योगदान राहील असंही मोदी म्हणाले. 

हे वाचा - वाढत्या कोरोनामुळे परदेशी प्रवाशांसाठी नवे SOP; 22 फेब्रुवारीपासून नियमांची अंमलबजावणी

कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट
सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्च 2021 या कालावधीत तेल उत्पादनात दर दिवशी 10 लाख बॅरेलची कपात करण्याची घोषणा केली. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सौदी अरेबियाने तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आणि रशियासह सहकारी देशांसह करारा अंतर्गत हे पाऊल उचललं होतं. यातून तेलाच्या किंमती 63 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत. यामुळे भारतात पेट्रोलचे दर 100 रुपये लीटरच्या वर पोहोचले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol price hike pm modi says previous govts not cutting import dependence