तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच! भारत बायोटेककडून माहिती गोळा करणे सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांबाबतची विविध आकडेवारी सादर करण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) भारत बायोटेकला सांगितले आहे.

नवी दिल्ली- भारत बायोटेक कंपनीकडून आयसीएमआरच्या सहकार्याने तयार होणाऱ्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या आधी दुसऱ्या टप्प्यात ज्यांना ही लस देण्यात आली त्यांची सविस्तर आणि संपूर्ण माहिती (डेटा) गोळा केली जात आहे. त्या आधारावर त्यांच्यावर कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यात येतील.

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांबाबतची विविध आकडेवारी सादर करण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) भारत बायोटेकला सांगितले आहे. त्यानंतर तशा प्रकारच्या चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून परवानगी देण्यात येईल. कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या १० राज्यांतील १९ ठिकाणी केल्या गेल्या. दिल्ली, मुंबई, लखनौ, पाटणा आदी महानगरांतील सुदृढ लोकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात आल्या. 

रामविलास पासवान यांच्या अंत्यसंस्कारावेळी चिराग बेशुद्ध पडले 

१८ वर्षांपुढील २८,५०० लोकांवर त्या चाचण्या केल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. त्यांची माहिती व लस टोचल्यानंतरचे त्यांच्या प्रकृतीवरील परिणाम यांचा डेटा जमा करण्यात येत आहे. भारत बायोटेकने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कोरोना लसीमध्ये एक असे औषध मिसळण्यात येणार आहे, ज्यामुळे संबंधितांची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) आणखी मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी ठरेल. या औषधाचे नाव अलहायड्रोक्सिक्विम-२ असे आहे. कोरोना लसीसाठी हे औषध सहाय्य करण्याचे काम करेल. या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी व्हायरो व्हॅक्‍स एलएलसी या अन्य एका कंपनीबरोबर भारत बायोटेकने स्वतंत्र करार केला आहे. कोरोनावरील लसीमध्ये अलहायड्रोक्‍सीक्वीम मिसळल्याने तिची परिणामकारक क्षमता अधिक वाढेल असा वैज्ञानिकांचा विश्‍वास आहे.

भारत होतोय शस्त्रसज्ज! चिनी ड्रोनचा सामना करणार रुस्तम-२ आणि इस्त्राईली हेरॉन 

क्लिनिकल चाचण्या अंतिम टप्प्यात

भारत बायोटेकतर्फे तयार करण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीच्याही (कोव्हॅक्सिन) दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. यासाठी सहकार्य करणाऱ्या पुण्याच्या राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था प्रयोगशाळेच्या वतीने (एनआयव्ही ) सार्स कोव्ह-२ नावाचा निष्क्रिय घटक बाजूला करण्यात आला आहे. त्यामध्ये अलहायड्रोक्‍सीक्वीम-२ एक सहाय्यक घटक म्हणून मिसळला जाणार आहे. त्यानंतर कोरोनावरील भारतीय लसीच्या अंतिम टप्प्यातील निर्मिती प्रक्रियेला वेग येईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: phase three trial will start after information collection said bharat biotech corona virus