esakal | पंतप्रधानांकडून घोषणा नाहीच; पण तीन लशींचे काम प्रगतीपथावर असल्याची दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi independence day

भारतात कोरोना लस कधी येणार यावरून अनेक अफवा याआधी पसरल्या होत्या. त्यामध्ये पंतप्रधान मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून कोरोना लस तयार झाल्याची घोषणा करतील अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

पंतप्रधानांकडून घोषणा नाहीच; पण तीन लशींचे काम प्रगतीपथावर असल्याची दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशभरात आज 74 वा स्वातंत्र्यदिन (independence day) उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी (PM Modi) लाल किल्ल्यावर भाषण केलं. यावेळी पंतप्रधानांनी अनेक घोषणा केल्या. सध्या जगभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये संशोधन सुरु आहे. मोदी म्हणाले की, वैज्ञानिक आणि डॉक्टर दिवसरात्र कोरोनावर लस तयार करण्यासाठी झटत आहेत. लवकरच लस तयार करण्यात येईल. तसंच लस प्रत्येकापर्यंत कशी पोहोचेल यावर सरकार काम करत आहे. 

भारतात कोरोना लस कधी येणार यावरून अनेक अफवा याआधी पसरल्या होत्या. त्यामध्ये पंतप्रधान मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून कोरोना लस तयार झाल्याची घोषणा करतील अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यापार्श्वभूमीवर मोदी खरंच कोरोना लशीची घोषणा करणार का याची उत्सुकताही लागून राहिली होती. मात्र अशा प्रकारची कोणती घोषणा न करता मोदींनी कोरोनावर लस तयार होत असल्याचं त्यांच्या भाषणात सांगितलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात सध्या कोरोनाच्या लसीवरील काम प्रगतीपथावर असून लवकरच ती लस तयार होईल. लस तयार झाल्यानंतर ही लस सर्व भारतीयांपर्यंत पोहचवण्यात येईल. सध्या भारतात तीन लसींवर काम सुरू आहे. त्यांच्या चाचण्या विविध टप्प्यात आहे. चाचण्या पार पडल्यानंतर शास्त्रज्ञांनी परवानगी दिल्यानंतर लसीचं उत्पादनाला सुरुवात होईल. मोदींनी भाषणात तीन लसी तयार होत असल्याचे सांगितले पण त्यांनी कोणत्या कंपन्या लस तयार करत आहेत याबाबत माहिती दिली नाही. जाणून घेऊया भारतात कोणत्या कंपन्या कोरोनाच्या लशीवर काम करत आहेत.

हे वाचा - स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिला खास कानमंत्र

भारत बायोटेक(Bharat Biotech/ICMR)-
भारतातील पहिली देशी लस(vaccine) तयार करण्याच्या शर्यतीत भारत बायोटेक सर्वात पुढे आहे. हैद्राबादमध्ये कंपनीची लॅब असून भारत बायोटेक ICMR(Indian Council of Medical Research) सोबत कोवॅक्सीन( Covaxin) या कोरोनावरील लशीचे संशोधन करत आहे. सध्या या कंपनीची लशीची मानवी चाचणी घेतली जात आहे. 

झायडस कॅडीला (Zydus Cadila)
अहमादबाद इथं असलेल्या औषध निर्मिती कंपनी झायडस कॅडीला कोरोनाच्या लशीवर काम करत आहे. ही कंपनी सध्या  'ZyCoV-D' अशी लस तयार करत आहे. या कंपनीची लसदेखील मानवी चाचणीच्या टप्प्यात आहे. झायडस कॅडीला त्यांची लस 2021 मध्ये बाजारात आणण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - ध्वजावंदनच्या वेळी PM मोदींसोबत दिसलेल्या लष्करी महिला अधिकारी कोण माहितेय का?

सिरम (Serum Institute of India)-
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी ठरली असून आता त्याची भारतात मानवी चाचणी सुरु आहे. यामध्ये पुण्यातील Serum Institute of India (SERI) ही संस्था त्याचे उत्पादन करणार आहे. संस्थेला DGCI ने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि Astra-Zeneca यांनी तयार केलेल्या लसींची मानवी चाचणी भारतात घेण्यास परवानगी दिली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यत या लसीची  चाचणी पुर्ण होईल. त्यानंतर सर्व परवानग्या मिळाल्यानंतर लस उपलब्ध होईल.