
Prime Minister Narendra Modi’s upcoming Manipur visit gains momentum as the Kuki-Zo Council decides to reopen National Highway-2, a major government success.
esakal
Kuki-Zo Council announces reopening of National Highway-2 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १३ सप्टेंबर रोजी मणिपूर दौरा होवू शकतो. मोदींच्या या मणिपूर दौऱ्यापूर्वी सरकारने मोठे यश मिळवले आहे.
कुकी-झो काउंसिलने मणिपूरमधील बंद असलेला राष्ट्रीय महामार्ग-२ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग २ उघडण्याबरोबरच, राज्यात शांतता पुनर्संचयित करण्याबाबत कुकी-झो काउंसिल आणि गृह मंत्रालयामध्ये काही करारही झाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून, गृह मंत्रालयाचे पथक मणिपूरमध्ये शांतता पुनर्संचयित करण्याच्या पुढाकाराच्या दिशेने मणिपूर हिंसाचारात सहभागी गटांशी वाटाघाटी करत होते, त्यानंतर आता सरकारला महत्त्वाचे यश मिळाले आहे आणि राष्ट्रीय महामार्ग २ उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुकी-झो काउन्सिलशी झालेल्या चर्चेत असेही ठरले आहे की, हा गट मणिपूरमधील सुरक्षा दलांना पूर्ण सहकार्य करेल. राष्ट्रीय महामार्ग २ ही मणिपूरची लाईफलाइन मानली जाते. हा महामार्ग मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळला कांगपोक्पी आणि चुराचांदपूर सारख्या शहरांशी जोडतो. मणिपूरमधील चुराचांदपूरमध्ये कुकी समुदायाचे वर्चस्व आहे. राज्यातील वांशिक हिंसाचारानंतर या समुदायाने महामार्ग बंद केला होता.
गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कुकी-झो काउन्सिलने राष्ट्रीय महामार्ग २ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि केझेडसीच्या शिष्टमंडळात झालेल्या अनेक बैठकींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कुकी-झो कौन्सिलने एनएच-०२ वर शांतता राखण्यासाठी भारत सरकारने तैनात केलेल्या सुरक्ष दलांना सहकार्य करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.