PM मोदींनी त्यांच्या भाषणात बल्गेरियाच्या पंतप्रधानांचा उल्लेख का केला?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणावेळी आणखी एका देशाच्या पंतप्रधानांचे नाव घेतले. महाराष्ट्रापेक्षा क्षेत्रफळाने जवळपास निम्म्या आकाराचा देश असलेल्या बल्गेरियाचे पंतप्रधान बोरिसोव्ह.

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला मार्गदर्शन केलं. यावेळी मोदी म्हणाले की, लोकांनी लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन गांभीर्याने केलं. पुढेही तशीच काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणावेळी आणखी एका देशाच्या पंतप्रधानांचे नाव घेतले. महाराष्ट्रापेक्षा क्षेत्रफळाने जवळपास निम्म्या आकाराचा देश असलेल्या बल्गेरियाच्या पंतप्रधानांना मास्क न घातल्यानं 13 हजार रुपयांचा दंड भरावा लागला. याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 

बल्गेरियाचे पंतप्रधान बॉयको बोरिसोव्ह  यांच्याबद्दल मोदींनी सांगितले. बॉयको यांनी मास्क न घातल्यानं दंडात्मक कारवाई करण्यात आली. बल्गेरियात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला लागल्यानंतर नियम पुन्हा कडक करण्यात आले. याचदरम्यान, पंतप्रधान बोरिसोव्ह एका दौऱ्यावर गेले होते. त्याचे लाइव्ह टेलिकास्ट टिव्हीवर सुरू होते. तसंच फेसबुकवरही व्हिडिओज शेअर करण्यात आले होते.

वेळीच टाळेबंदी केल्याने लाखो जीव वाचले- मोदी

फोटो आणि व्हिड़िओमध्ये राइला मॉनेस्ट्रीमध्ये पंतप्रधान बोरिसोव्ह हे मास्कशिवाय दिसत होते. विशेष म्हणजे त्याच दिवशी आरोग्य मंत्रालयाने मास्क घालणं बंधनकारक केलं होतं. मास्क न घातलेल्या लोकांवर आरोग्य मंत्रालयाने कारवाई केली. यामध्ये पंतप्रधानांसह त्यांच्या ताफ्यात असलेल्या अधिकारी आणि पत्रकारांवर जवळपास 170 डॉलर म्हणजेच 13 हजार रुपयांचा दंड ठोठावला. याआधी बोरिसोव्ह यांचा GERB पक्ष आणि देशाचा प्रमुख विरोधी पक्ष सोशलिस्ट पार्टीवरही मोठ्या संख्येनं लोक जमवल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी लाइव्हद्वारे संवाद साधताना गरीब आणि गरजू लोकांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी मोफत अन्न धान्य देण्याची योजना पुढच्या पाच महिन्यांपर्यंत सुरू राहणार असल्याचं सांगितलं. सरकारने निर्णय घेतला आहे की, 80 कोटी लोकांना मोफत अन्न धान्य देणाऱी योजना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्येही लागू राहिल. याकाळात 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत दिलं जाणार आहे. तसंच प्रत्येक कुटुंबाला एक किलो डाळ मोफत दिली जाईल.

खूशखबर ! संपूर्ण भारतीय बनावटीची कोरोनावरील पहिली लस तयार

मोदी म्हणाले की, वेळीच टाळेबंदी केल्यानं कोरोनाच्या संकटात लाखो लोकांचे जीव वाचले. मात्र आता अनलॉक सुरू झाल्यानंतर नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला आहे. लॉकडाऊनमध्ये जशी काळजी घेतली तशीच आताही घेणं गरजेचं आहे.  80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवठा केला आहे. देशातील एकही नागरिक उपाशी पोटी झोपला नाही पाहिजे असंही मोदी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi mention bulgeria pm who fined for nowt wear mask