esakal | शेतकरी ज्याची पूजा करतात त्यालाच विरोधकांनी पेटवलं - पंतप्रधान मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi

देशात सुरू असलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधावरही पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली. विरोध करणाऱ्यांना शेतकरी स्वतंत्र झालेलं पाहवत नाही असं मोदी म्हणाले.

शेतकरी ज्याची पूजा करतात त्यालाच विरोधकांनी पेटवलं - पंतप्रधान मोदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेच्या सुरुवातीपासून मोदी सरकाने त्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमामी गंगे मिशन अंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा मेगा योजनांचे उद्घाटन केलं. यावेळी मोदी म्हणाले की, जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवलं जाईल. गंगा आपल्या वारशाचं प्रतिक आहे. गंगा देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला समृद्ध करते.

याआधीही गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी अनेक मोठ्या मोहिमा चालवल्या पण त्यात लोकांचा सहभाग नव्हता. तो असता तर गंगा स्वच्छ झाली असती. स्वच्छ पाण्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंडमध्ये एक रुपयात पाण्याचे कनेक्शन दिले जात आहे. आधी दिल्लीत निर्णय व्हायचे पण जल जीवन मिशनमुळे गावातच निर्णय होते आहे.

दरम्यान, देशात सुरू असलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधावरही मोदींनी प्रतिक्रिया दिली. विरोध करणाऱ्यांना शेतकरी स्वतंत्र झालेलं पाहवत नाही. शेतकरी ज्याची पूजा करतात त्यालाच आग लावली जात आहे. देशात एमएसपी राहील आणि विरोधक एमएसपीबाबत जो दावा करत आहेत तो खोटा आहे असंही मोदी म्हणाले. 

हे वाचा - राहुल गांधींची किसान की बात; काँग्रेस कृषी कायद्यांना देणार न्यायालयात आव्हान

गंगा नदीत मिसळणाऱ्या दुषित पाण्याला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भविष्याचा विचार करून प्लांट तयार केले असून गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेली शहरे हागणदारी मुक्त केली आहे. तसंच गंगेच्या उपनद्यांना स्वच्छ केलं जात आहे. नमामी गंगे अंतर्गत 30 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या योजनांचे काम सुरू असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. याआधी पाण्यासारखा पैसा वापरला जायचा पण स्वच्छता होत नव्हती. आता पैसा ना पाण्यात वाहतो ना पाण्यासारखा वाहतो असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

हे वाचा - देशात कोरोना येतोय आटोक्यात, रिकव्हरी रेट वाढला तर मृत्यूच्या आकडेवारीत घट

मोदी म्हणाले की, उत्तराखंडमध्ये 130 गटारे गंगेत सोडली जात होती. मात्र आता ती थांबवण्यात आली आहे. प्रयागराज इथं गंगा नदीच्या सफाईचं कौतुक लोकांनी केलं. आता हरिद्वारमध्येही प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. याशिवाय मैदानी भागात मिशन डॉल्फिनची मदत मिळेलं असंही मोदींनी सांगितलं.