WHO प्रमुखांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक; म्हणाले, कोरोनाविरोधातील लढ्यात भारताची भूमिका महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाशी लढताना इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ नये यावर जोर दिला.

नवी दिल्ली-  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टीए ग्रेब्रेयेसस यांच्यात कोरोनाशी निपटण्यासाठी जागतिक स्तरावरील भागीदारीबाबत बुधवारी चर्चा केली. त्याचबरोबर या दिशेने आधुनिक उपचार पद्धतीबरोबरच पारंपारिक औषधांचा समावेश करण्यास ते राजी झाले आहेत. 

पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांशी चर्चा केली आणि जागतिक महामारीशी सामना करण्यासाठी जागतिक भागीदारीत समन्वय साधण्यात संघटनेच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाशी लढताना इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ नये यावर जोर दिला. त्याचबरोबर त्यांनी विकसनशील देशांमध्ये आरोग्य प्रणालीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळत असलेल्या मदतीची प्रशंसा केली. 

हेही वाचा- Bihar Election : नितीश कुमार, सुशील मोदींना समर्थन नसेल; चिराग यांनी केलं स्पष्ट

यावेळी डब्ल्यूएचओ प्रमुखांनी आयुषमान भारत आणि क्षयरोगाविरोधात भारताने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. जागतिक आरोग्य संबंधात भारताला महत्त्वाची भूमिका पार पाडायची असल्याचे त्यांनी म्हटले. 

हेही वाचा- तणाव निवळण्याची चिन्हे; चिनी सैन्य एप्रिलपूर्वीच्या ठिकाणी जाण्यास तयार

यावेळी पंतप्रधान मोदी आणि ग्रेब्रेयेसस यांच्यात पारंपारिक औषध प्रणालीवरुनही सकारात्मक चर्चा झाली. विशेषतः जगभरातील लोकांचे आरोग्य चांगले करणे आणि त्यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासंदर्भात यावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान कोविड-19 साठी आयुर्वेद थीमच्या आधारावर 13 नोव्हेंबरला देशात 'आयुर्वेद दिवस' साजरा केला जाणार असल्याचे ग्रेब्रेयेसस यांना सांगितले. त्यानंतर ग्रेब्रेयेसस यांनी टि्वट करुन पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi WHO DG discuss global collaboration for combating covid 19