
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप खासदार तथा अभिनेता सनी देओल यांच्याबरोबरील दीप सिद्धूचे फोटो व्हायरल झाले होते.
नवी दिल्ली- शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावरील घुमुटावर झेंडा फडकवल्याचा आरोप असलेला अभिनेता दीप सिद्धू अजूनही फरार आहे. याचदरम्यान दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठ्याप्रमाणात हिंसाचार झाला होता. आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या घुमुटावर जाऊन निशाण साहिबचा झेंडा फडकवला होता.
दरम्यान, 26 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्याप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते. चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी तसेच उपद्रव माजवल्याप्रकरणी पोलिसांनी दीप सिद्धूविरोधात एफआयआर दाखल केला होता.
हेही वाचा- Rajyasabha: कृषी कायद्यावरुन विरोधकांचा गोंधळ; आपचे ३ खासदार निलंबित
नोव्हेंबर महिन्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीप सिद्धू पंजाब व्यतिरिक्त देशभरात पोहोचला होता. या व्हिडिओत सिद्धू हा सिंघू सीमेवर शेतकऱ्यांबरोबर उभा होता. यावेळी तो एका पोलिस अधिकाऱ्याशी इंग्रजीत बोलताना दिसला होता. सुरुवातीला इंग्रजीत बोलणारा शेतकरी म्हणून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तो पंजाबी चित्रपटातील अभिनेता असल्याचे सर्वांना समजले. त्याने अनेक चित्रपटांत कामे केली आहेत.
हेही वाचा- 'सरकारविरोधात आंदोलनाने नोकरीला मुकाल'; बिहार सरकारच्या निर्णयावर 'तेजस्वी' ताशेरे
भाजपशी जोडले गेले नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप खासदार तथा अभिनेता सनी देओल यांच्याबरोबरील दीप सिद्धूचे फोटो व्हायरल झाले होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सिद्धूने हे कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात येत आहे. सिद्धूने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत सनी देओलसाठी गुरुदासपूर येथे प्रचार केला होता. दरम्यान, मंगळवारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओल यांनी दीप सिद्धूचा आणि आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला होता.