#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यावरून राजकीय वादंग

लेथपोरा - जम्मू - काश्‍मीरमध्ये गेल्या वर्षी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष झाले.  यातील हुतात्मा सहकाऱ्यांना आदरांजली वाहताना ‘सीआरपीएफ’चे जवान.
लेथपोरा - जम्मू - काश्‍मीरमध्ये गेल्या वर्षी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष झाले. यातील हुतात्मा सहकाऱ्यांना आदरांजली वाहताना ‘सीआरपीएफ’चे जवान.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४० शूर जवान हुतात्मा झाले. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी त्या घटनेवरून राजकीय धुळवड पहायला मिळाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला, असा सवाल विचारल्यावर भडकलेल्या भाजपने, राहुल गांधी कायम दहशतवाद्यांबरोबरच असतात, असा प्रतिहल्ला चढविला.

पुलवामा हल्ल्याला एक 
वर्ष झाल्याच्या दिवशी गांधी यांनी आज सकाळीच ट्विट करून, सरकारला तीन प्रश्न विचारले. पुलवामा हल्ल्याचा सर्वांत जास्त फायदा कोणाला झाला?, हल्ल्याच्या तपासातून काय आढळले? आणि या हल्ल्याला सरकारमधील कोण जबाबदार? असे ते प्रश्‍न आहेत. राहुल यांच्या ट्विटमधील छुपे राजकीय संदर्भ लक्षात येताच खवळलेल्या भाजपने त्यांच्यावर जबरदस्त प्रतिहल्ला चढविला. काँग्रेसचे विधान हा देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शूरवीरांचा व लष्कराचाच अपमान असल्याचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले. 

राहुल व त्यांचा पक्ष कायम लष्करे व जैशसारख्या दहशतवादी संघटनांच्या बाजूने सहानुभूती बाळगूनच बोलतात, असे पक्षप्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. राहुल यांनी असे बेजबाबदार विधान करून केवळ सरकारच नव्हे तर सुरक्षा दलांवरही संशय व्यक्त केल्याचेही पात्रा म्हणाले. असे प्रश्न विचारणारे केवळ भौतिकदृष्ट्याच भ्रष्ट नसतात तर त्यांचे आत्मेही भ्रष्टच असतात, असेही पात्रा म्हणाले. 

पंतप्रधान मोदी मात्र या राजकारणापासून आज दूर होते. त्यांनी सकाळीच ट्विट करून पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहताना म्हटले की ``मागील वर्षी पुलवामा येथे आजच्याच दिवशी सुरक्षा दलांवर भ्याड हल्ला झाला होता. त्यात हुतात्मा झालेल्या देशाच्या ४० सुपुत्रांना माझी श्रद्धांजली.’

ज्यांनी देशासाठी बलिदान केले त्यांचा हा अपमान आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अडचणीत आणण्यासाठी राहुल गांधी यांचे ही विधाने पाकिस्तानला लाभदायी ठरतात. 
- शहनवाझ हुसेन, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते

हुतात्मा झालेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांचे आज स्मरण केले जात आहे. आपल्या शूर जवानांना माझा सलाम. त्यांच्या कुटुंबांप्रती माझी सहानुभूती आहे. 
- ममता बॅनर्जी,  पं. बंगालच्या मुख्यमंत्री

काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांना पायबंद
जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. लेथपोरा भागात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवादी हल्ला होऊन त्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठीच्या रणनीतीत बदल केला. आता दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीमच आखली जाते. दहशतवाद्यांचे अड्डे शोधून त्यांना पकडले जात आहे किंवा चकमकीत मारले जात आहे. 

‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आदिल डरने केलेला हा हल्ला काश्‍मीरमधील ३० वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाईच्या पद्धतीत बदल केला असून, एकत्रित कारवाईची दहशतवाद्यांवर जरब बसत आहे. सुरक्षा दलांच्या बदललेल्या रणनीतीमुळे असे हल्ले करणे आता सोपे राहिलेले नाही.

कारस्थाने ठरताहेत फोल
दहशतवादी हल्ल्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला अधूनमधून मिळत असते; पण गेल्या वर्षापासून सुरक्षा दलांनी नवी व्यूहरचना आखली असून सुरक्षा अधिक बळकट केली आहे अशी माहिती ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com