प्रज्ञा ठाकूरचा पुन्हा 'नथूराग'; अखेर हकालपट्टी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसे याची भरसंसदेत स्तुती केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर हिला संरक्षणविषयक संसदीय समितीतून काढून टाकण्याची नामुष्की आज सत्ताधारी भाजप नेतृत्वावर ओढावली.

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसे याची भरसंसदेत स्तुती केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर हिला संरक्षणविषयक संसदीय समितीतून काढून टाकण्याची नामुष्की आज सत्ताधारी भाजप नेतृत्वावर ओढावली. दुसरीकडे ठाकूर हिने आपण गोडसेला नव्हे, तर सरदार उधमसिंग यांना देशभक्त म्हटले, असा कांगावाही केला आहे. प्रज्ञाच्या या बेताल वक्तव्याचे संसदेमध्येही तीव्र पडसाद उमटले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

तथाकथित साध्वी असलेल्या प्रज्ञाने याआधीही गांधीजींच्या मारेकऱ्यांची स्तुती केल्याने तिला माफी मागावी लागली होती. 

स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप (एसपीजी) कायद्याबाबत बुधवारी चर्चेत नाक खुपसताना प्रज्ञाने पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजप नेतृत्वालाच तोंडघशी पाडले होते. प्रज्ञा हिचे संसदेमध्ये भाषण सुरू असताना, खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शहा नेहमीप्रमाणे मौनात गेल्याने याचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आज भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ठाकूर हिच्यावर तोंडदेखली कारवाई केल्याचे दाखविले. नड्डा यांनी जाहीर केले की, ""ठाकूर हिची संसदीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली असून, सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात तिला पक्षाच्या संसदीय बैठकांत भाग घेण्यासही मनाई करण्यात आली आहे.'' आता ठाकूर हिला पक्षातूनच बाहेर काढण्याकडे पक्षनेतृत्वाचा कल असल्याचेही बोलले जाते. 

भाजपला मोठा दणका; पोटनिवडणुकीत तीनही जागांवर पराभव

प्रत्यक्षात काय झाले होते? 
भाजपच्या कारवाईनंतरदेखील प्रज्ञा हिच्या वक्तव्याचे संसदेत जोरदार पडसाद उमटले. सूत्रांच्या माहितीनुसार त्यानंतर ठाकूर हिच्या पाठीशी भक्कम उभ्या असेलल्या भाजपच्या मातृसंस्थेतून याबद्दलच्या संभाव्य बुद्धिभेदाबाबत हालचाली सुरू झाल्या व दुपार येता येता ठाकूर हिने ट्विट करून सरदार उधमसिंग यांना आपण देशभक्त म्हटल्याचा कांगावा सुरू केला. तिने म्हटले आहे की, ""कधी कधी खोटे इतके मोठे होते, की दिवसाही रात्र झाल्याचे वाटू लागते. पण सूर्य आपला प्रकाश कधीही गमावत नाही. खोट्याच्या या अंधारातही सत्याचा सूर्यप्रकाश कायम आहे. सत्य हे की आपण उधमसिंगांचा अपमान सहन करू शकलो नाही.'' प्रत्यक्षात मात्र द्रमुकचे ए. राजा. जेव्हा गोडसेचा संदर्भ देत होते, त्याच वेळी ठाकूर हिने ताडकन उठून, (गोडसे नामक) देशभक्ताबद्दल तुम्ही असे म्हणू शकत नाही, असे म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pragya thakur removed after nathuram godse statement

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: