दौपदी मुर्मू राष्ट्रपदी; मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग, शपथविधी २५ जुलैला

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा अपेक्षेप्रमाणे आज दणदणीत विजय
president election 2022 Daupadi Murmu 15 President of India cross-voting oath on July 25
president election 2022 Daupadi Murmu 15 President of India cross-voting oath on July 25sakal

नवी दिल्ली : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा अपेक्षेप्रमाणे आज दणदणीत विजय झाला. त्यांना एकूण मतांच्या ६४ टक्के, तर ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली. सरन्यायाधीश येत्या २५ जुलै रोजी मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर निवड झालेल्या मुर्मू या सर्वांत तरुण राष्ट्रपती (६४ वर्षे एक महिना आणि आठ दिवस) ठरल्या आहेत. त्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपतीही ठरल्या आहेत. अनेक भाजप विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिल्याने उमेदवारी जाहीर होताच मुर्मू यांचा विजय अपेक्षितच होता व आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनी मुर्मू यांच्या निवडीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ मंत्री व एनडीएतील पक्षनेते यांनी मुर्मू यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रपतिपदासाठी १८ रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी आज झाली. ७७६ खासदार व ४०३३ आमदार असे एकूण ४८०९ मतदार होते. त्यापैकी ४७५४ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ४७०१ मते वैध ठरली तर ५३ मते अवैध ठरली. यापैकी मुर्मू यांना २८२४ मते मिळाली त्यांचे एकत्रित मतमूल्य ६७६८०३ एवढे आहे. तर यशवंत सिन्हा यांना १८७७ मते मिळाली. त्यांचे एकत्रित मतमूल्य ३८०१७७ एवढे आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा अस्तित्वात नसल्याने खासदारांचे मतमूल्य घटून प्रत्येकी ७०८ ऐवजी ७०० इतके होते. या निवडणुकीत राष्ट्रपतिनियुक्त खासदार व विधान परिषदेच्या आमदारांना मतदानाचा हक्क नसतो. राज्यसभा सचिवालयातील क्र. ६३ या दालनात राज्यांच्या व संसदेतील मतदानाच्या मतपेट्या २४ तास कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आल्या होत्या. तेथेच आज सकाळी ११ पासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्याचे सचिवालयातर्फे सांगण्यात आले. पहिल्या फेरीत संसद सदस्यांच्या ७४८ मतांची मोजणी झाली. त्यात मुर्मू यांना ५४० तर सिन्हा यांना २०८ मते मिळाली. मुर्मू यांनी पहिल्याच फेरीत भरघोस आघाडी घेतली तिथेच त्यांचा विजय दृष्टिपथात आला होता.

दुसऱ्या फेरीच्या मतगणनेत मुर्मू यांची आघाडी आणखी वाढली. या फेरीत आंध्रप्रदेश, छत्तीसगड, बिहार, अरुणाचल प्रदेश व गोवा या राज्यांची मतगणना झाली. या फेरीअखेर मुर्मू यांना एकूण १३४९ तर सिन्हा यांना ५३७ मते मिळाली. मुर्मू या दुसऱ्या फेरीतच ४ लाख ८३ हजार २९९ मतमूल्य मिळवून विजयाच्या जवळ पोहोचल्या होत्या.

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेरच मुर्मू यांचा विजय स्पष्ट झाला. या निवडणुकीसाठी तिसऱ्या फेरीअखेर दहा लाख ३८ हजार ४३१ या एकूण मतमूल्याच्या निम्म्याहून जास्त म्हणजे ५ लाख ७ हजार ७७७ मते मुर्मू यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना २ लाख ६१ हजार ६२ मते मिळाली. मुर्मू यांचा विजय स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांचे अभिनंदन केले.

मोठ्या प्रमाणावर ‘क्रॉस व्होटिंग’

मुर्मू यांना मिळालेल्या मतदानामध्ये विरोधी पक्षांच्या खासदार आणि आमदारांची संख्या लक्षणीय आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार किमान १७ खासदार आणि किमान १२५ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ करून मुर्मू यांच्या बाजूने कौल दिला. आसाम, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील आमदारांची संख्या सर्वांत जास्त होती. आसाममधील २२, मध्य प्रदेशातील २० आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून मुर्मू यांच्या पारड्यात मत टाकल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बिहार आणि छत्तीसगडमधील विरोधी पक्षांच्या प्रत्येकी चार, गोव्यातील चार आणि गुजरातमधील दहा आमदारांनीही मुर्मू यांना मते दिल्याचे दिसून येते. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी तेलुगु देशमच्या सर्व आमदारांनी मुर्मू यांना मतदान केले. दुसरीकडे यशवंत सिन्हा यांना केरळमधील सर्व आमदारांची मते मिळाली.

घराबाहेर जल्लोष

विजय स्पष्ट होताच द्रौपदी मुर्मू यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर एकच जल्लोष सुरू झाला. भाजपने दिल्लीच्या विविध भागातही जल्लोष सुरू केला. आसाम, मिझोराम, नागालँड आदी राज्यांमधून आलेली आदिवासी कलापथके दिल्लीच्या मुख्य भागातील चौकाचौकात भाजपने बनवलेल्या विशेष व्यासपीठांवर नृत्य करू लागली. भाजपने या निमित्ताने एक अभिनंदन यात्राही आयोजित केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com