प्रियांका गांधींना धक्काबुक्की; उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप!

वृत्तसंस्था
शनिवार, 28 डिसेंबर 2019

भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांशी अशा प्रकारचे वर्तन केले जात आहे. मात्र, या दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही.

लखनऊ : नागरिकत्व कायद्यावरून देशात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. उत्तर प्रदेशात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. 

''उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी एका माजी पोलिस अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी जाताना पोलिसांनी मला अडवले. माझा गळा दाबला आणि मला ढकलून दिले,'' असा गंभीर आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी (ता.28) उत्तर प्रदेश पोलिसांवर केला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी असलेल्या एस. आर. दारापुरी यांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी काँग्रेसच्या राज्य मुख्यालयातून निघाल्या होत्या. मात्र, लोहिया चौकात पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पायी चालत जात असताना पोलिसांनी मला घेरले, आणि एका महिला पोलिस कर्मचारीने माझा गळा दाबला. मला धक्का दिला त्यामुळे मी जमिनीवर पडले. त्यानंतर मी एका कार्यकर्त्याच्या टू-व्हिलरवरून जात असताना पुन्हा माझी अडवणूक करण्यात आली, अशी माहिती प्रियांका गांधी यांनी एएनआयशी बोलताना दिली. 

- FlashBack 2019 : क्रिकेटमध्ये दांडी; इतर खेळांमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी!

प्रियांका पुढे म्हणाल्या की, 77 वर्षांचे माजी पोलिस अधिकारी दारापुरी यांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने करावीत, अशा आशयाची फेसबुक पोस्ट प्रदर्शित केली होती. त्यांची पत्नी आजारी असतानाही पोलिसांनी त्यांना अटक केली. भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांशी अशा प्रकारचे वर्तन केले जात आहे. मात्र, या दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही. आमचा सत्याग्रह आहे. मी उत्तर प्रदेशची प्रभारी असल्याने राज्यात कुठे जायचे याचा निर्णय भाजप सरकार घेऊ शकत नाही. भाजप भ्याडपणाने हल्ले करत आहे. 

- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज:दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांनाही दिलासा?

याप्रकरणी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक सिंह म्हणाले की, लोहिया चौकात जेव्हा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची गाडी अडवली तेव्हा त्यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, थोडे पुढे चालत गेल्यानंतर प्रियांका एका गाडीवर बसल्या. पुढे मुन्शी पुलिया भागात पोलिसांनी अडविल्यानंतर त्या पुन्हा चालू लागल्या. त्यामुळे पोलिस आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तो गोंधळ सुरू असताना प्रियांका दारापुरी यांच्या घरी पोहचल्याची माहिती मिळाली. त्यांनी सुमारे तीन किलोमीटर पायी प्रवास केला. 

- मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर

दारापुरी यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर प्रियांकांनी माध्यमाशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी गाडीमधून शांततेने प्रवास करत होते. मग यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कशी काय बिघडणार होती? माझ्यासोबत तीनपेक्षा जास्त लोक नव्हते. आणि मी याची कल्पना कोणालाही दिली नव्हती. मला अडविल्यानंतरही मी चालत गेले. तर मला थांबवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? जर मला अटक करायची असेल तर करा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi accuses UP Police of strangulating her