esakal | कोरोनावर परिणामकारक आयुर्वेदीक ‘आयुष ६४’, पुण्यातील शास्त्रज्ञाची महत्त्वाची भूमिका

बोलून बातमी शोधा

ayush 64

कोरोनावर परिणामकारक आयुर्वेदीक ‘आयुष ६४’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: कोरोनाचा देशात हाहा:कार... कुठे ऑक्सिजन, तर कुठे रेमडेसिव्हिरचा तुटवडा. या गोंधळात कोरोनापासून भारतीयांची सुटका करण्यासाठी संशोधन क्षेत्र मात्र सातत्याने काम करीत आहे. आयुष मंत्रालयाने कोरोनावर उपचारासाठी वनौषधींनी बनलेले आयुष ६४ हे औषध तयार केले आहे. या औषधाच्या संशोधनात पुण्यातील शास्त्रज्ञांचे योगदान आहे.

सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी हे औषध वापरता येणार आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) हे औषध विकसित केले आहे. आयुष-६४ म्हणजे सप्तपर्णा, कुटकी, काडेचिरायित, सारगोटा या चार वनौषधींचा वापर करून तयार केलेले औषध. कोरोनाची लक्षणे नसलेल्या वा सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या बाधित रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्यासाठी हे औषध उपकारक ठरणार असल्याचा दावा आयुष मंत्रालयाने केला आहे. हे औषध १९८० मध्ये मलेरियासाठी विकसित केले होते. आता कोरोनावरील उपचारासाठी याचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा: परीक्षेत मार्क कमी पडल्याने १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

भारतातील पारंपरिक वनौषधींचे महत्त्व यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. औषधाच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी नुकतीच करण्यात आली. पुणे येथील संधिवात रोग केंद्राचे संचालक आणि आयुष मंत्रालय-सीएसआयआरचे मानद समन्वयक डॉ. अरविंद चोपडा यांनी तीन केंद्रांवर ही चाचणी घेण्यात आल्याचे सांगितले. यात लखनौ, वर्धा आणि मुंबई येथील कोविड रुग्णालय केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर ७० सहभागी व्यक्तींवर ही चाचणी करण्यात आली. ॲलोपॅथीचे तज्ज्ञ आणि आयुर्वेदाचे तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन चाचण्यांच्या निष्कर्षावर अभ्यास केला आहे.

मूळचे पुण्याचे आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, की आयुष-६४ चे परिणाम अत्यंत चांगले असून. सद्यस्थितीत गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. या औषधाच्या निष्कर्षांचा आढावा घेतला असून आणि लक्षणे नसलेल्या, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या रुग्णाच्या उपचारासाठी या औषधाचा उपयोग करण्यात येणार आहे. सध्या प्रचलित औषधोपचार आहे, त्याच्याबरोबरीने हे औषध द्यायचे असून, ते पूरक औषध आहे. त्याचा वापर केल्यानंतरचे निष्कर्ष खूप चांगले आणि दिलासादायक आहेत.

हेही वाचा: ना रुग्णालय, ना व्हेंटिलेटर तरी गंभीर रुग्ण ‘रिकव्हर’

सध्या कोरोनाची वाढती संख्या पाहता, लक्षणे नसलेल्या वा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणे योग्य ठरणार आहे. ‘आयुष ६४’ या औषधांमुळे ते शक्य होऊन रुग्णालयावर पडणार ताण कमी होईल. सौम्य लक्षणे आढळल्यानंतर नियमित औषधांबरोबर हे वनौषधींनी बनलेले औषध दिल्यास रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होणार आहे.

- डॉ. भूषण पटवर्धन, राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक, आयुष