esakal | ना रुग्णालय, ना व्हेंटिलेटर तरी गंभीर रुग्ण ‘रिकव्हर’

बोलून बातमी शोधा

covid 19
ना रुग्णालय, ना व्हेंटिलेटर तरी गंभीर रुग्ण ‘रिकव्हर’
sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर: वय ४८, ऑक्सिजनची पातळी ४०, एचआरसीटी स्कोअर २२. हे आकडे पाहिले तर तो कोरोनाचा रुग्ण किती गंभीर असेल याची कल्पनाच न केलेली बरी. पण अशा एका शेतकऱ्याने जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. या शेतकऱ्याला येथे खासगी रुग्णालय मिळाले नाही, व्हेंटिलेटर तर दूरच, रेमडेसिव्हिरचा प्रश्न तर नंतरचा होता. अशा गंभीर अवस्थेत हा शेतकरी महापालिकेच्या येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाला होता. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य उपचार केले अन् अवघ्या सहा दिवसांत त्याला बरे करून घरी पाठवले. घरी जाताना त्याची ऑक्सिजन पातळी ९८ पाहून या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा चेहऱ्यावर आनंद काही वेगळाच होता.

अंकोली (ता. लातूर) येथील शेतकरी इस्माईल सय्यद यांना काही दिवसांपूर्वी ताप, दम, खोकला, डोकेदुखी आदी लक्षणे होती. त्यांच्या मुलाने त्यांना २२ एप्रिलला येथील एका ओळखीच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने एचआरसीटीची तपासणी करण्यास सांगितले. तो स्कोअर २२ आला. ऑक्सिजनची पातळी ४० होती. ही आकडेवारी पाहून सय्यद कुटुंबीयाचे पायच गळाले. त्यातच डॉक्टरांनी त्यांना तातडीने कोविड रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सय्यद यांना घेऊन कुटुंबीय शहरातील काही खासगी रुग्णालयात गेले; पण तिथे बेड शिल्लक नव्हते.

हेही वाचा: 'जिल्हाधिकारी डॉ. विखेंना पाठीशी घालत आहेत का?'

त्यामुळे ते महापालिकेच्या येथील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये आले. डॉक्टरांनी सय्यद यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. हे सेंटर म्हणजे रुग्णालय नाही, तेथे व्हेंटिलेटर नाहीत किंवा तेथे रेमडेसिव्हिरसारखे इंजेक्शनही दिले जात नाही. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णावर तेथे उपचार होतात; पण डॉक्टरांनी सय्यद यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सय्यद यांची दुर्दम्य इच्छाशक्ती कामी आली. औषधांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

दोन दिवसांत त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत गेली. अवघ्या सहा दिवसांत बरे झालेल्या सय्यद यांना २८ एप्रिलला शुभेच्छापर झाडाचे रोपटे लावून सेंटरमधून घरी पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांची ऑक्सिजनची पातळी ९८ होती. यावेळी सय्यद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही वेगळाच होता. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये गंभीर असलेल्या सय्यद यांच्यावर योग्य उपचार केल्याने महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले.

हेही वाचा: परीक्षेत मार्क कमी पडल्याने १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

शहरातील रुग्णालयात बेड न मिळाल्याने सय्यद हे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये आले होते. ऑक्सिजनची पातळी ४० वर आल्याने ते गंभीरच होते. तातडीने त्यांच्या उपचार सुरू केले. त्यांनीही औषधांना प्रतिसाद दिला. डॉक्टरांचे प्रयत्न व त्यांची इच्छाशक्तीमुळे अवघ्या सहा दिवसांत ते बरे झाले.

- डॉ. प्रशांत माले, आरोग्य अधिकारी, महापालिका

वडिलांचा ऑक्सिजनची पातळी व एचटीसीटीचा स्कोअर पाहून आम्ही घाबरलो होतो. त्यात खासगी रुग्णालयात बेड न मिळाल्याने अधिकच चिंता होती. शेवटी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना दाखल केले. तेथील डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याने वडील बरे झाले आहेत.

- सिद्दीक सय्यद, अंकोली. (सय्यद यांचा मुलगा)