esakal | शेतकऱ्यांचा आज संसदेवर एल्गार; पोलिसांकडून अटींचा मारा
sakal

बोलून बातमी शोधा

rakesh tikait

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज (ता. २२) संसद मार्च काढण्याची घोषणा करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना जंतर मंतर येथे शांततापूर्ण धरणे धरण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली.

शेतकऱ्यांचा आज संसदेवर एल्गार; पोलिसांकडून अटींचा मारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज (ता. २२) संसद मार्च काढण्याची घोषणा करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना जंतर मंतर येथे शांततापूर्ण धरणे धरण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली. केवळ २०० आंदोलकांना कोवीड अटींचे पालन करून एक दिवस धरणे धरण्यास परवानगी देतानाच पोलिसांनी असंख्य अटी लादल्या. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, आम्ही रोज जंतर मंतरवर शेतकऱ्यांची संसद चालवू. पोलिसांनी जाऊ दिले तर तेथे जाऊ, अन्यथा तुरुंगातून शेतकरी संसद चालवू. (Protesting farmers to launch agitation against agri laws at Delhi Jantar Mantar from today)

आंदोलक शेतकऱ्यांना हरियानाचे माजी मुख्यमंत्री व इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला यांचीही साथ मिळाली आहे. चौटाला यांनी बुधवारी सिंघू सीमेवर शेतकरी नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, गुरुवारपासून शेतकरी जंतर मंतरवर व विरोधी पक्षांचे खासदार त्या परिसरात संसदेचा घेराव करतील. आम्ही अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण करू की या सरकारला हे काळे कायदे मागे घ्यावेच लागतील.

हेही वाचा: Pegasus Row: थरुर यांची संसदीय समिती करणार अधिकाऱ्यांची चौकशी

यंदा २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेला हिंसाचार पाहता पोलिसांनी संसद मार्चसाठी आधी साफ परवानगी नाकारली. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (गुन्हा शाखा) सतीश गोलचा व सहआयुक्त जसपालसिंग यांनी जंतर मंतर भागात जाऊन चर्चच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर आंदोलकांची व्यवस्था कशी केली जाईल याची पाहणी केली. आंदोलकांना पोलिसांच्या सक्त देखरेखीत सकाळी ११.३० वाजता बसगाड्यांमधूनच यावे लागेल. सायंकाळी बरोबर पाच वाजता आंदोलन समाप्त करून त्याच गाड्यांमधून सिंघू, गाझीपूर व टीकरी सीमांवर त्यांना परत त्यांना सोडले जाईल, अशी मुख्य अट पोलिसांनी ठेवली आहे. निमलष्करी दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या जातील.

पोलिसांनी आम्हाला अटक केली, मारहाण केली व गोळीबार केला तरी आम्ही संसद मार्च काढणार व संसदेवर ठिय्या देणारच असे टिकैत म्हणाले. तथापि संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) पहिल्या टप्प्यात शांततापूर्ण आंदोलन करू व पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, हीच भूमिका घेतली आहे. आंदोलक शेतकरी संघटनांनी संसद अधिवेशनादरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान जंतर मंतरवर एक दिवसीय किसान संसदेचे आयोजन करण्यात येईल व २२ जुलैपासून रोज टिकरी व सिंघू सीमांवरील किमान २०० शेतकरी जंतर मंतरवर धरणे आंदोलन करतील अशी घोषणा करण्यात आली होती. संसदेचे अधिवेशन सध्या सुरू असल्याने रोज आंदोलन करण्यास परवानगी दिल्ली पोलिस देतील अशी चिन्हे नाहीत.

हेही वाचा: CBSE १० वी निकाल 2021: लवकरच cbseresults.nic.in वर जाहीर होणार तारीख

दरम्यान, शेतकरी नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत पोलिसांनी कोरोनामुळे संसद धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची संख्या कमी करण्याचा जो प्रस्ताव दिला होता तो शेतकरी नेत्यांनी फेटाळला होता. आपले आंदोलन शांततापूर्ण राहील व ते जंतर मंतर येथेच होणार असले तरी पोलिस संसदेचा घेराव करण्यात येणार, असा अपप्रचार करून आंदोलनाला बदनाम करत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता.

ड्रोनमधून नजर ठेवणार

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेजवळच्या परिसरातील जंतर मंतर, संसद मार्ग, रफी मार्ग, रेडक्रॉस व रायसीना रस्ता, इंडिया गेट, मंडी हाऊस आदी ठिकाणी आजपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलकांवर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येईल. समाजकंटकांविरूद्ध वापरले जाणारे दंगाविरोधी सुरक्षा दलही शेतकऱ्यांना घेरून नेमण्यात येईल. जंतर मंतरवरून जाणाऱ्या बसचा मार्गही आजच रात्रीपासून बदलण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे उद्या दिल्ली मेट्रोची अत्यंत वर्दळीची सहा स्थानके (केंद्रीय सचिवालय,राजीव चौक (कॅनॉट प्लेस), मंडी हाऊस, पटेल चौक, जनपथ, उद्योग भवन, लोककल्याण मार्ग) कोणत्याही क्षणी बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात प्रवेश पत्र दाखवूनच उद्यापासून प्रवेश दिला जाईल.

loading image