पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली; ४० ते ५० किलो स्फोटके असलेली मोटार जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 मे 2020

भारतीय सुरक्षा दलांनी आज पुन्हा एकदा प्रसंगावधान दाखवित पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टाळली.४० ते ५०किलोची आयईडी स्फोटके वाहून नेणारे एक वाहन बुधवारी सुरक्षा दलांनी जप्त केले.

श्रीनगर - भारतीय सुरक्षा दलांनी आज पुन्हा एकदा प्रसंगावधान दाखवित पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टाळली. ४० ते ५० किलोची आयईडी स्फोटके वाहून नेणारे एक वाहन बुधवारी सुरक्षा दलांनी जप्त केले. मागील वर्षी ज्याप्रमाणे पुलवामात दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता अगदी त्याच धर्तीवर पुन्हा हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनांचा डाव होता अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षी सीआरपीएफ जवानांच्या वाहन ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बनावट नोंदणी असलेली एक पांढऱ्या रंगाची सँट्रो कार तपास नाक्यावर रोखण्याचा प्रयत्न केला पण चालकाने पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडून गाडी तशीच पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी गाडीवर गोळीबार केला असता चालकाने गाडी घटनास्थळी सोडून पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांना पुढे याच गाडीत स्फोटकांचा साठा सापडला. याबाबत पोलिस महासंचालक विजयकुमार यांनी सांगितले की ''आम्हाला या संभाव्य हल्ल्याची माहिती याआधीच मिळाली होती. आम्ही दोन दिवसांपासून या गाडीचा शोध घेत होतो. सुरक्षा दलांना पुन्हा लक्ष करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता. या कारचा चालक हा हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवादी असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे .त्याचे जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनेसोबत लागेबांधे असावेत असाही सुरक्षा दलांना संशय आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार नष्ट केली 
दहशतवाद्यांची ही गाडी बॉम्ब शोधक पथकाने नष्ट केली, यावेळी गाडीचा झालेला स्फोट एवढा तीव्र होता की त्यामुळे या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. या कारमधील स्फोटकांची तीव्रता लक्षात घेऊन अनेक घरे रात्रीच रिकामी करण्यात आली होती, येथील नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी पाठविण्यात आले होते. मोहिमेत पोलिसांप्रमाणेच निमलष्करी दलाचे जवान देखील सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama attack Security forces seized a vehicle carrying 40 to 50 kg IEDs