esakal | पंजाब-गुजरातमध्ये कोरोनाचं तांडव; मृत्युदरात शहरे अव्वल

बोलून बातमी शोधा

Corona Death

पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रत्येकी १०० कोरोना रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही मृत्यूंची संख्या १ टक्क्यापेक्षा जास्त झाली आहे.

पंजाब-गुजरातमध्ये कोरोनाचं तांडव; मृत्युदरात शहरे अव्वल
sakal_logo
By
वृत्तसंस्था

चंदीगड : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. गेल्या आठवड्यापासून देशात दररोज तीन लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृत्यूही वाढत आहेत. कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची टक्केवारी १.३ टक्के एवढी झाली आहे. देशातील प्रत्येकी १०० कोरोना संक्रमित रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होत आहे. काही शहरात कोरोना मृत्यूदर २.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा: राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे १ कोटी डोस शिल्लक : केंद्र सरकार

पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रत्येकी १०० कोरोना रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू होत आहे. दुसरीकडे दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही मृत्यूंची संख्या १ टक्क्यापेक्षा जास्त झाली आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये परिस्थिती भयानक बनली आहे. लुधियानामध्ये आतापर्यंत एकूण ५१ हजार ४९२ जणांना कोरोनाची लागण झाली. पण त्यापैकी १ हजार ३२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण २.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. २० ते २७ एप्रिल या कालावधीत कोरोना संक्रमित लोकांची संख्या १.८ टक्के होती. लुधियानाप्रमाणे पंजाबमधील बहुतेक शहरांची स्थिती जवळपास एकसारखीच आहे. जालंधरमध्ये १ हजार ६०, अमृतसरमध्ये ९१३, होशियारपूरमध्ये ७११, पटियालामध्ये ७४४ आणि भटिंडामध्ये ३२५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Covishield : सीरमचं महाराष्ट्राला प्राधान्य, देशभरातून 34 कोटी डोसची ऑर्डर

दुसरीकडे गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोरोना मृतांची संख्याही धडकी भरवणारी आहे. अहमदाबादमध्येही २ हजार ५०० पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला असून तेथील मृत्युदर २.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये आतापर्यंत ६ हजार ६५६ मृत्यू झाले असून त्यापैकी ४० टक्के मृत्यू एकट्या अहमदाबादमध्ये झाले आहेत.

महाराष्ट्रातही वाढतायत मृत्यू

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या प्रत्येकी १०० जणांपैकी २ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे. मुंबईत ६ लाख ३५ हजार ४८३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १२ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या शहरांमध्ये कोरोना मृतांची संख्या जास्त आहे, त्यामध्ये दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत कोरोना मृत्युदर १.५ टक्के आहे.

हेही वाचा: माझं वर्षभराचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी!

मध्य प्रदेशात वाढू लागली संख्या

मध्य प्रदेशच्या भोपाळ, इंदूर, उज्जैन, जबलपूर, सागर आणि बुऱ्हाणपूरमधील कोरोना मृत्युदर एक टक्क्यावर पोहोचला आहे. इंदूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. तेथे आतापर्यंत १ लाख ५ हजार ४२९ लोकांना संसर्ग झाला असून त्यापैकी १ हजार ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भोपाळमध्ये ८४ हजार ३९६ लोक संक्रमित झाले त्यापैकी ७२४ लोकांचा मृत्यू झाला आहे.