
एक्झिट पोलवर बंदी आणा; सुखबीरसिंग बादल
अमृतसर (पंजाब) : निवडणूक निकालाशी संबंधित एक्झिट पोल (मतदानोत्तर चाचणी) आणि ओपिनियन पोलवर बंदी आणण्याची मागणी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी आज केली. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज अनेक एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अकाली दलाने ही मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुखबीरसिंग बादल म्हणाले, की अकाली दल जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते. ईश्वराने आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही. पंजाबमधील कोणाही व्यक्तीला विचारल्यास ती एक्झिट पोलवर विश्वास नाही, असेच सांगेल. गेल्या निवडणुकीतही पंजाबमध्ये आपला १०० पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात निकालात मात्र वेगळेच चित्र दिसले. त्याचप्रमाणे, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस थोड्याफार फरकाने विजय मिळवेल, असा अंदाज एक्झिट पोलद्वारे वर्तविण्यात आला होता. मात्र, तृणमूलने मोठ्या फरकाने विजय मिळविला. त्यामुळे, ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलवर बंदी आणायला हवी.
केंद्राकडून पैसे देऊन मतदानोत्तर चाचण्या
निवडणूक आयोग निवडणुकीशी संबंधित सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करत असतो. मात्र, केंद्र सरकार मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून पैसे देऊन ओपिनियन आणि एक्झिट पोल करून घेते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पंजाबमधील निवडणुकीत बसप आणि अकाली दल युती करून सरकार स्थापन करतील. काँग्रेसचा यावेळी पूर्णपणे नि:पात होईल, असेही ते म्हणाले.
Web Title: Punjab Assembly Elections Ban Exit Polls Sukhbir Singh Badal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..