
पंजाबला खंबीर आणि निर्णयक्षम मुख्यमंत्र्याची आवश्यकता ; तिवारी
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील गटबाजी आणि मतभेद थांबायला तयार नसून, मुख्यमंत्री चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसाठी शड्डू ठोकले असताना, पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी(Manish Tewari) यांनी, ‘पंजाबला(Punjab)खंबीर आणि निर्णयक्षम मुख्यमंत्र्याची आवश्यकता आहे" , असा घरचा आहेर देत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
हेही वाचा: रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील: केजरीवाल
पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस निवडणूक लढवत असून तेच प्रमुख चेहरा राहतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पक्षश्रेष्ठींना इशारा देताना, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय कॉंग्रेस हायकमांड नव्हे तर जनता करेल, असे म्हटले होते. प्रत्युत्तरादाखल चन्नी यांनी आपणच लोकप्रिय असल्याचाही दावा केला होता. या वादात मनीष तिवारी यांनी खोचक ट्विट करून पक्षाच्या या नेतेद्वयींवर शरसंधान केले. आव्हानांना तोंड देऊ शकेल आणि कठोर निर्णय करू शकेल, अशा मुख्यमंत्र्यांची पंजाबला गरज आहे. सोशल इंजिनियरिंगवर, मनोरंजनावर, फुकटाची खिरापत वाटण्यावर राजकारण अवलंबून असलेल्यांऐवजी पंजाबला गंभीर नेतृत्वाची गरज आहे, असा टोला तिवारी यांनी लगावला. खासदार मनीष तिवारी हे कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात.
हेही वाचा: कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर
उमेदवार जाहीर न केल्याने काँग्रेसचा पराभव: चन्नी
मुख्यमंत्रिपदावरून सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही त्यावेळी काँग्रेसचा पराभव झाला, असे भाष्य त्यांनी केले.एका स्थानिक वाहिनीशी चन्नी यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, पक्षाने जेव्हा हा उमेदवार जाहीर केलेला नाही तेव्हा पराभव झाला आहे. २०१७ मध्ये उमेदवार जाहीर करण्यात आला आणि विजय झाला. त्यामुळे पक्षाने ही घोषणा करायला हवी. सिद्धू यांनी खास शैलीत हायकमांडलाच चुचकारले होते.
Web Title: Punjab Need For A Strong Decisive Cm Tiwari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..