

Pushkar Festival 2025 Royal Anmol Buffalo Worth 23 Crore and Shahbaz Horse Sold for 15 Crore
Esakal
पुष्कर (राजस्थान), ता.२८ (पीटीआय) ः नेहमीप्रमाणे यंदाही येथील प्राण्यांचा मेळा चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल पंधरा कोटी रुपयांचा घोडा, २३ कोटी रुपयांची म्हैस अन् अवघी सोळा इंच उंचीची गाय या मेळ्याचा आकर्षणबिंदू ठरली आहे. दरवर्षी या मेळ्यामध्ये प्राण्यांच्या विविध महागड्या प्रजातींचे दर्शन होते. केवळ देशभरातूनच नाही तर परदेशातून देखील अनेकजण हा मेळा पाहण्यासाठी तसेच प्राण्यांची खरेदी करण्यासाठी आवर्जून येथे येत असतात. या मेळ्याला गुरुवारपासून (ता.३०) प्रारंभ होत असून तो पाच नोव्हेंबरपर्यंत चालेल. प्राण्यांचे व्यापारी अन् प्राणीप्रेमींनी हा मेळा सुरू होण्या आधीपासूनच येथे मुक्काम ठोकला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही या मेळ्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल दोन हजार कर्मचारी यासाठी तैनात करण्यात येतील. राज्याच्या पशुकल्याण विभागाचे कर्मचारी देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. या मेळ्यात येणाऱ्या प्रत्येक जनावराची तपासणी केली जाणार आहे. सर्व प्राण्यांची डिजिटल नोंद देखील ठेवण्यात येईल.