..तर घुसखोरी करायची चीनची हिंमत नसती; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर घणाघात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

राहुल गांधी यांनी तमिळनाडूतील इरोडच्या ओडानिलाईमध्ये विणकर लोकांशी संवाद साधला.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवस तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते अनेकदा अनेक मुद्यांवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसतात. आज रविवारी त्यांनी महगाईच्या मुद्यावर मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय त्यांनी म्हटलंय की, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्याऐवजी त्यांना दहशतवादी म्हणत आहे. 

राहुल गांधी यांनी तमिळनाडूतील इरोडच्या ओडानिलाईमध्ये विणकर लोकांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी म्हटलं की, जर भारतातील कामगार, शेतकरी आणि विणकर मजबूत असते, सुरक्षित असते आणि त्यांना संधी मिळाली असती तर चीनने कधीच भारतात घुसण्याची हिंमत केली नसती.

हेही वाचा - कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी उकळले अधिक पैसे; हिंदू पुजाऱ्यांवर दक्षिण अफ्रिकेत आरोप

याआधी राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, मोदीजींनी GDP म्हणजेच गॅस-डीझेल-पेट्रोल च्या दरांचा जबरदस्त विकास करुन दाखवला आहे. जनता महगाईने त्रस्त आहे तर मोदी सरकार टॅक्स वसूली करण्यात मस्त आहे. आपल्या या ट्विटसोबत त्यांनी एका वृत्तपत्राचा स्क्रीनशॉटदेखील पोस्ट केला आहे. ज्यात तेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींची तुलना केली आहे. 

राहुल यांनी जो स्क्रीनशॉट शेअर केलाय त्यामध्ये म्हटलंय की एक जुलै, 2020 ला जयपुरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594.5 रुपये झाली होती. तर सात जानेवारी, 2021 ला ही रक्कम 698 रुपये झाली आहे. तर जयपुरमध्ये एक जुलै 2020 ला डिझेल 83.64 रुपये होते तर जानेवारी 2021 मध्ये डिझेल 83.64 रुपये झाले होते. पुढे राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दराची तुलना केली आहे. त्यांनी म्हटलंय की, एक जुलै 2020 ला पेट्रोलची किंमत 87.57 रुपये होती तर सात जानेवारी 2021 ला पेट्रोल 91.63 रुपये  झाली आहे.   एका आठवड्यात चौथ्यांदा किंमतींमध्ये वाढ झाल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आतापर्यंत सर्वाधिक उंचीवर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 85.70 प्रति लीटर आणि मुंबईमध्ये 92.28 रुपये प्रति लीटर झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi Congress in Erode Tamil Nadu attack centre over petrol diesel gas price hike