अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या कोरोनायोध्याच्या संरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 September 2020

कोरोना महामारीतून बरे होणाऱ्यांबाबत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले

नवी दिल्ली- कोरोना महामारीत जीव धोक्‍यात घालून गेले सहा महिने अहोरात्र रुग्णसेवा करणारे डॉक्‍टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणाऱ्या महामारी (दुरुस्ती) २०२० या विधेयकाला राज्यसभेने आज मंजुरी दिली. या कायद्याचा परीघ पोलिस व ‘आशा’ कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवावा आणि कोरोना योध्यांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी वक्‍त्यांनी केली. मात्र मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योध्यांची नेमकी संख्या किती, या प्रश्‍नाला सरकारकडून उत्तर मिळाले नाही.

अमेरिका-चीन युद्ध होण्याची भीती; रशियानेसुद्धा सुरू केल्या हालचाली

कोरोना काळात एप्रिलमध्ये सरकारने हा अध्यादेश आणला होता. या चर्चेत डॉक्‍टरांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद असल्याने कोरोना योध्यांचे मनोबल वाढणार असले तरी केवळ महामारी काळातच नव्हे तर अन्य वेळेतही सरकारी व खासगी डॉक्‍टरांवरही हल्ले करणारांवर कारवाईची तरतूद या विधेयकात करावी, असे राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांनी सांगितले. ‘आशा’ कर्मचाऱ्यांनाही या कायद्याच्या परिघात आणावे अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा देताना कोरोना योध्यांचे वेतन वाढविण्याची सूचना केली. खासगी रुग्णालयांच्या कोरोनाकालीन लूटमारीला पायबंद घालावा अशी मागणी बसपचे वीरसिंह व इतरांनी केली. कोरोना काळातही राज्य सरकारांच्या पाडापाडीचे उद्योग करणाऱ्या पक्षांवर त्यांच्याकडील हा जास्तीचा पैसा पंतप्रधान केअर निधीत जमा करण्याची सक्ती करण्याची उपरोधिक मागणीही प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपचे नाव न घेता केली. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की डॉक्‍टरांना वेतन देण्यासाठी राज्यांना केंद्राने यापूर्वीच निधी दिला आहे. राज्यांना पीपीई कीट व अन्य उपकरणे दिली असून अनेक राज्यांनी आपल्याकडे हे साहित्य ठेवण्यास जागा नसल्याचे कळविले आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर भारत वैद्यकीय योजनाही अंमलात येणार आहे.

अमेरिकेलाही टाकले मागे
कोरोना महामारीतून बरे होणाऱ्यांबाबत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले असून देशात आतापावेतो ४२ लाख ८४ हजार ३१ लोकांनी कोरोनाविरूध्दची लढाई जिंकली आहे. अमेरिकेत बरे होणारांची संख्या ४१ लाख ९१ हजार ८९४ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज ट्‌विट करून ही माहिती दिली. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही (रिकव्हरी रेट) ७९.२८ पर्यंत वाढले असून मृत्यूदर घटून १.६१ टक्‍क्‍यांवर आला आहे.

पाणी आणि विज बिलात 50 टक्क्यांची सुट; जम्मू-काश्मीरसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा

कोरोनाबाधितांची संख्या : ५३ लाख ८ हजार १५ (नवे रुग्ण ९३ हजार ३३७)
एकूण मृत्यूमुखी पडलेले : ८५ हजार ६१९
(मागील २४ तासांत आणखी १२४७ मृत्यू)
एकूण चाचण्याः ६ कोटी २४ लाख ५४ हजार २५४

देशातील रुग्णसंख्येचा टप्पा
७ ऑगस्ट : २० लाख+
२३ ऑगस्ट: ३० लाख+
५ सप्टेंबर : ४० लाख +
१६ सप्टेंबर: ५० लाख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajya Sabha approves bill to protect coronary warriors who serve patients day and night