भाजपची खेळी; राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मुस्लिम उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली आहे. या होण्याऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाने मुस्लिम उमेदवाराची घोषणा केली आहे.

लखनऊ - ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला समाजवादी पक्षाचे खासदार अमरसिंह यांचे निधन झाले होते. अमरसिंह हे समाजवादी पार्टीकडून राज्यसभेवर खासदार होते. त्यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशातील राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. राज्यसभेतील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली आहे. या होण्याऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाने मुस्लिम उमेदवाराची घोषणा केली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाने  प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांना रिंगणात उतरवलं आहे.

काही दिवसांपुर्वी मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपात आणण्यात जफर इस्लाम यांनी मोठी भूमिका बजावली होती. जर सय्यद जफर इस्लाम यांनी ही राज्यसभेची पोटनिवडणुक जिंकली तर सय्यद जफर इस्लाम भाजपचे सद्यस्थितीत राज्यसभेतील दुसरे मुस्लिम खासदार ठरतील. या अगोदर भाजपकडून मुख्तार अब्बास नख्वी हे मुस्लिम खासदार आहेत.

भाजपमध्ये याआधी शाहनवाज हुसेन, आरिफ बेग आणि सिकंदर बखत हेदेखील मुस्लिम खासदार राहिले आहेत.  भाजपाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुख्तार अब्बास नक्वी, शाहनवाज हुसेन आणि आरिफ बेग यांनी भाजपकडून लोकसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. विशेष म्हणजे आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुका केवळ तीन मुस्लिम खासदारांनाच  जिंकता आल्या आहेत. तसेच आतापर्यंत भाजपाच्या इतिहासामध्ये मुख्तार अब्बास नक्वी, शाहनवाज हुसेन, सिकंदर बख्त (राज्यसभा) आणि आरिफ बेग हे चारच मुस्लिम खासदार झाले आहेत.  सय्यद जफर इस्लाम जर निवडून आले तर ते भाजपाचे पाचवे मुस्लिम खासदार ठरतील.

हे वाचा - सरकारविरोधात एकीने लढा देऊ; विरोधकांचा निर्धार

जफर इस्लाम इन्वेस्टमेंट बँकर
सध्या जफर इस्लाम हे भाजपचे प्रवक्ते आहेत. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत ते भाजपची बाजू मांडतात. राजकारणात येण्यापूर्वी जफर इस्लाम एका परदेशी बँकेत नोकरी करत होते. मोदींच्या राजकारणाने प्रभावित झालेल्या जफर इस्लाम यांनी भाजपामध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला केली होती. जफर इस्लाम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सलोख्याचे संबंध असल्याचे मानले जाते. कदाचित यामुळेच भाजपाने केंद्राच्या राजकारणात मवाळ व अतिशय सभ्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या जफर इस्लाम यांना राज्यसभेच्या या जागेसाठी संधी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up rajya sabha bjp candidate syed zafar islam for by election