राज्यसभेत काँग्रेसनं नेता बदलला; ज्येष्ठ व्यक्तीकडे विरोधीपक्ष नेतेपदाची धुरा

टीम ई सकाळ
Friday, 12 February 2021

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून आता पक्षाने त्यांचा नवा विरोधी पक्षनेता निवडला आहे.

नवी दिल्ली - राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सभागृहातला काँग्रेसने विरोधी पक्षनेता बदलला आहे. काँग्रेसने शुक्रवारी नव्या नेत्याची निवड केली असून त्याबाबतचे पत्र राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवले आहे. आता ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

कर्नाटकचे असलेले मल्लिकार्जुन खरगे हे 2014 ते 2019 या कालावधीत लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षाने राज्यसभेवर पाठवलं होतं. 

हे वाचा - ममतांना पुन्हा धक्का; 'नुसतंच बसून घुसमट होतेय' म्हणत खासदाराचा राज्यसभेतच राजीनामा

मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातले असून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. विद्यार्थी संघटनेचे नेता म्हणून मल्लिकार्जुन खरगे राजकारणात सक्रीय झाले होते. त्यांनी कर्नाटकच्या गुलबर्गा शहरात सरकारी कॉलेजमध्ये ते विद्यार्थ्यांचे नेते म्हणून निवडून आले होते.

वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायदे सल्लागार म्हणून काम केलं होतं. कर्नाटकातील कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला आणि ओळखही निर्माण केली. 1967 मध्ये काँग्रेसमध्ये आले आणि गुलबर्गा शहराच्या काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर आतापर्यंत काँग्रेसमधील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

हे वाचा - Rinku Sharma Murder - ज्याने पत्नीला रक्त देऊन वाचवले त्यालाच इस्लामने संपवले?

आझाद 2014 पासून विरोधी पक्षनेते
 राज्यसभेचा कार्यकाळ संपलेले खासदार गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरमधील नेते आहेत. जवळपास 41 वर्षे ससंदेच्या राजकारणात वावरले. 2014 पासून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसंच पाच वेळा राज्यसभेत तर दोन वेळा लोकसभेतही प्रतिनिधीत्व केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajya sabha mp gulam nabi azad congress mallikarjun kharge next leader of opposition