राम मंदिर निकालाची वर्षपूर्ती साजरी करण्यास मनाई; अयोध्येतील सर्व कार्यक्रम रद्द

वृत्तसंस्था
Sunday, 8 November 2020

९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी मंदिर प्रकरणी मंदिर पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला होता. या ऐतिहासिक निकालाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काहीजणांनी उत्सव आणि धार्मिक समारंभांची घोषणा केली होती.

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त दरवर्षी भव्य महोत्सव साजरा केला जातो. यंदाही या महोत्सवाची तयारी जोरात सुरू झालेली दिसून येत आहे. दरम्यान सोमवारी (ता.९) ऐतिहासिक राम मंदिराच्या निकालाला एक वर्ष पूर्ण होत आहे. राम मंदिराच्या बाजूने झालेल्या निर्णयाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांची घोषणा लक्षात घेत प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने शहरातील नवीन कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. याशिवाय परवानगीशिवाय आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड-१९ प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर, अयोध्येतील सर्व कार्यक्रमांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.

Corona Updates: दिलासादायक! जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात​

९ नोव्हेंबरला झाला होता ऐतिहासिक निकाल
९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी मंदिर प्रकरणी मंदिर पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला होता. या ऐतिहासिक निकालाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काहीजणांनी उत्सव आणि धार्मिक समारंभांची घोषणा केली होती. पण कोरोना प्रतिबंधात्मक योजना लक्षात घेत अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. 

डीआयजी दीपक कुमार म्हणाले, 'परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम करता येणार नाही. जर कोणी असे केल्याचे आढळून आले, तर त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिस प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.'

मास्क लावा! कारण सर्वसामान्यांना लस मिळायला 2022 उजाडणार​

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, अयोध्येत होणारा भव्य दीपोत्सव व्हर्चुअली साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अनेक साधू-महंतांनी रामजन्मभूमीच्या निर्णयाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांची घोषणा केली होती. याची दखल घेत प्रशासन सतर्क झाले आहे आणि नवीन कार्यक्रम साजरे करण्यास परवानगी नाकारत अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. तसेच ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. नागरिकांनी कोणताही नवीन कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram temple verdict will not be celebrated in Ayodhya