मास्क लावा! कारण सर्वसामान्यांना लस मिळायला 2022 उजाडणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

कोरोनाची लस येत्या वर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोरोना नावाच्या विषाणूने गेल्या आठ महिन्यांपासून जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावाने बरेच नुकसान झाले आहे. सध्या भारतात कोरोनाची आकडेवारी ही घसरती आहे. मात्र, असं असलं तरीही कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाहीये. युरोपातील अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आणि त्या देशांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाशी लढण्यासाठी म्हणून जगभरात ठिकठिकाणी लसनिर्मितीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. सर्वसामान्य लोकांना कधी एकदा लस येतेय असं झालं आहे मात्र, ही लस मिळायला 2022 साल उजाडेल, असं दिसतंय.

हेही वाचा - Corona Updates: दिलासादायक! जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात

कोरोनाची लस येत्या वर्षाच्या अखेरिस अथवा पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, असं असलं तरीही लस प्राप्त होण्यामध्ये विलंब लागू शकतो. नेटवर्क 18 ला दिलेल्या एका मुलाखतीत दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याबाबत भाष्य केलं आहे. गुलेरिया हे एम्सचे संचालक आहेतच सोबतच ते कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य आहेत. त्यांनी म्हटलंय की, सध्या लगेचच कोरोना हा विषाणू संपणार नाहीये. भारतात लस यायला अजून एक वर्ष तर जाऊ शकते. भारताची लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे कोरोनाची लस अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला एका वर्षापेक्षाही अधिक काळ लागणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे या मुलाखतीत म्हटलं आहे. 

हेही पहा - आज काय विशेष : कोण आहेत Joe Biden आणि Kamala Harris?

या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं होतं की, कोरोना लस आल्यानंतर देशासमोर कोणती आव्हाने असणार आहेत? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, लशींच्या वितरणासाठी काही प्राथमिकता असेल. देशातील सर्वच भागात लस पोहोचवायची असेल तर प्राथमिकतेनुसारच लस वितरीत करण्यात येईल. कोल्ड चेन सांभाळून पुरेशा प्रमाणात इंजेक्शन देशातील सर्व भागात पोहोचवण्याचं आपल्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

हेही वाचा - मोदींनी गुजरातला दिली सुंदर भेट; भावनगर-सूरतदरम्यान समुद्री फेरी सेवेचे उद्घाटन

पुढे त्यांनी म्हटलंय की, पहिल्या टप्प्यातील लशींनंतर दुसऱ्या टप्प्यात येणारी लस ही अधिक परिणामकारक आणि प्रभावी असणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लशीचं काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. कोणाला पहिल्या टप्प्यातील लस द्यायची तसेच कुणाला दुसऱ्या टप्प्यातील लस द्यायची असे खुप सारे निर्णय एकाच वेळी घेण्याचं आव्हान असेल असं त्यांनी म्हटंलय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: till 2022 no coronavirus vaccine for common people said Randeep Guleria