पीएमसी बँक : ग्राहकांना दिलासा; पैसे काढण्याची मर्यादा वाढविली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात 'पीएमसी'च्या ठेवीदार आणि खातेदारांकडून आंदोलने केली जात आहेत. मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोरदेखील खातेदारांनी आंदोलन केले होते.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना गुरूवारी (ता.3) मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजारांवरून 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने गुरूवारी जाहीर केले.

या निर्णयाने बँकेच्या लाखो खातेदारांना फायदा होण्याची शक्‍यता आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. पीएमसी बँकेवर प्रशासकीय देखरेखीसाठी रिझर्व्ह बँकेने तीन सदस्यांची नियुक्ती केली आहे.

बँकेचा आर्थिक आढावा घेतल्यानंतर खातेदार आणि ठेवीदारांचा त्रास कमी करण्याच्यादृष्टीने पैसे काढण्याची मर्यादा 25 हजारांपर्यंत वाढवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात 'पीएमसी'च्या ठेवीदार आणि खातेदारांकडून आंदोलने केली जात आहेत. मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोरदेखील खातेदारांनी आंदोलन केले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढल्याने पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

बुडीत कर्जांसंदर्भातील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्याच्या सुरूवातीला पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. यानंतर ग्राहकांना खात्यातून एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यात 10 हजारांपर्यंत वाढ केली होती.

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांसाठी सोमवारी (ता.30) रिजर्व्ह बँकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी 1800223993 या क्रमांकावर नोंदवता येतील. त्याचबरोबर www.pmcbank.com या संकेतस्थळावर ग्राहक तक्रार करू शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Article 370 : ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कलम 370 बद्दल केले भाष्य; म्हणाले...

- Vidhan Sabha 2019 : महसूलखाते सांभाळलेल्या चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?

- पीएमसी बँक : 'पीएमसी'च्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI increases withdrawal limit Relief to PMC Bank customers