RBI केंद्र सरकारला देणार 57 हजार 128 कोटी; प्रस्तावाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

रिझर्व्ह बँक यंदा सरकारला 57128 कोटी रुपये डिव्हिडंड म्हणून देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाची बैठक पार पडली यामध्ये सरप्लस रक्कम सरकारला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या उत्पन्नाचे साधन काय? सरकारला डिव्हिडंड म्हणून पैसे का देते? असे अनेक प्रश्न असतात. रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत सरकारी बाँड, सोन्यात करण्यात आलेली गुंतवणूक आणि परदेशी बाजारामध्ये फोरेक्स आणि बाँड ट्रेडिंग हे आहेत. रिझर्व्ह बँक आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर जे काही शिल्लक राहतं ते पैसे सरकारच्या खात्यात पाठवते. रिझर्व्ह बँक यंदा सरकारला 57128 कोटी रुपये डिव्हिडंड म्हणून देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाची बैठक पार पडली यामध्ये सरप्लस रक्कम सरकारला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

रिझर्व्ह बँकेची स्थापना 1934 मध्ये झाली होती. रिझर्व् बँक ऑफ इंडिया अॅक्ट 1934 च्या चॅप्टर 4 सेक्शन 47 नुसार रिझर्व्ह बँकेला त्यांनी कमावलेल्या नफ्यातून सरप्लस फंड केंद्र सरकारला पाठवणं गरजेचं आहे. 

डिव्हिडंड म्हणजे काय?
कंपन्या त्यांच्या नफ्यातून वेळोवेळो शेअरहोल्डर्सना काही भाग देतात. फायद्यातील हा भाग शेअर होल्डर्सना डिव्हिडंड म्हणून दिला जातो. अशाच प्रकारे रिझर्व्ह बँक त्यांना झालेल्या नफ्यातील काही भाग सरकारला देते.

हे वाचा - समजून घ्या पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली फेसलेस टॅक्स स्किम

रिझर्व्ह बँकेकडे किती पैसे आहेत? 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चार प्रकारची खाती आहेत. RBI च्या 2017-18 च्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे जवळपास 9 लाख 60 हजार कोटी रुपये राखीव आहेत. 
1 ) चलन आणि सोने - बँकेकडे जवळपास 6.95 लाख कोटी रुपयांचे चलन आणि सोन्याचा साठा आहे. इतक्या किंमतीचे सोने, नाणी, नोटा रिझर्व्ह बँकेकडे आहेत. 
2) अॅसेट डेवलपमेंट फंड - या खात्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे 22 हजार 811 कोटी रुपये आहेत. 

हे वाचा -  सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक? वाचा संभाव्य परिणाम

3) गुंतवणूक खाते - रिझर्व्ह बँकेचे या खात्यामध्ये 13 हजार 285 कोटी रुपये आहेत. 
4) कंटिंजेंसी फंड - हे खातं सर्वात महत्वाचं असून यावरूनच मोठा गोंधळ आहे. रिझर्व्ह बँक जो काही नफा कमावतं त्यातील एक भाग या फंडामध्ये येतो. तर दुसऱा भाग सरकारला डिव्हिडंड म्हणून दिला जातो. सोनं आणि चलनानंतर सर्वाधिक पैसे या खात्यात आहेत. सध्या या खात्यात 2.32 लाख कोटी रुपये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rbi wil be transfer dividend to government which may higher than budget