दूतावासाला कर्मचारी संख्या ५० टक्क्यांनी कमी करा;  भारताने दिले पाकिस्तानला आदेश 

पीटीआय
Wednesday, 24 June 2020

पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे हेरगिरीचे कृत्य व दहशतवादी संघटनांशी असलेल्या कथित सहभागावर आधारित माहितीवरून हा निर्णय घेण्यात आला.पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात होता

नवी दिल्ली - आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या आठवडाभरात ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश भारताने मंगळवारी पाकिस्तानला दिले असून, इस्लामाबादमधल्या भारतीय दूतावासातल्या कर्मचाऱ्यांची संख्याही ५० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दिल्लीतल्या पाकिस्तानी दूतावासातले काही कर्मचारी हे भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्याचा संशय परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की पाकिस्तान दूतावासाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना या निर्णयाची माहिती दिली गेली असून, पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे हेरगिरीचे कृत्य आणि दहशतवादी संघटनांशी असलेल्या कथित सहभागावर आधारित माहितीवरून हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पाकिस्तानने कथित ‘हिट अँड रन’ प्रकरणात गोवलेल्या भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांसह पाच जण मंगळवारी मायदेशी परतले. अटारी-वाघा सीमेवरील प्रवेशद्वारावरून ते आज भारतात दाखल झाले. पाकिस्तानकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांना परत पाठविले जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भारतात परतलेल्यांमध्ये हवाई सल्लागार ग्रुपचे कॅप्टन मनू मिधा, द्वितीय सचिव एस. शिवकुमार, कर्मचारी पंकज, सेल्वादास पाऊल, द्विमू ब्रह्मा यांचा समावेश आहे. यातील सेल्वादास, द्विमू यांना १५ जूनला पाकिस्तानने हिट अँड रन प्रकरणात गोवले होते. त्यांना ताब्यात घेऊन कोठडीत ठेवले होते; मात्र भारताकडून वाढलेला दबाव पाहता, त्यांना दुसऱ्या दिवशी सोडून देण्यात आले. पाकिस्तानच्या भारतातील दोन कर्मचाऱ्यांना हेरगिरी करताना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानकडून हा कट रचण्यात आला. मात्र यात पाकिस्तानच्या हाती काहीच लागले नाही. पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात होता. त्याबाबत भारताने वारंवार पाकिस्तानकडे सूचना मांडल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानने उलट भारतीय कर्मचाऱ्यांना ‘हिट अँड रन’ प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduce embassy staff by 50 percent; India orders Pakistan