प्रजासत्ताक दिनी रिक्षा चालक, स्वच्छता कर्मचाऱ्यांना आमंत्रण; खास असणार सोहळा

Republic Day parade
Republic Day parade
Summary

यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ऐतिहासिक असा ठरणार आहे. जाणून घ्या काय आहेत यंदाच्या सोहळ्याची वैशिष्ट्ये

नवी दिल्ली - भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सोहळ्याची सध्या जय्यत तयारी दिल्लीत (Delhi) सुरु आहे. राजपथावर (Rajpath) होणाऱ्या या सोहळ्यातील पथसंचलान सहभागी होणाऱ्या रथांना परवानगी न मिळाल्यानं सध्या राजकारण सुरु आहे. दरम्यान, यंदाचा प्रजासत्ताक दिन हा वेगळा असणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे परदेशी पाहुणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र राजपथावर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात रिक्षा चालक, बांधकाम कामगार, सफाई कर्मचाऱ्यांसह इतर क्षेत्रातील कामगारांची उपस्थिती असणार आहे.

याबाबत संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी प्रजासत्ताक दिनी आमंत्रित करण्यात आलेल्यांच्या यादीमध्ये कामगार, स्वच्छता कर्मचारी, शिवाय फ्रंटलाइन वर्कर्स आणि रिक्षा चालकांचा समावेश आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला संधी देण्याचा यामागे उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. यात सहभागी असलेल्यांना दोन डोस घेतलेले असणं बंधनकारक असणार आहे.

परेड अर्धा तास उशिरा

यंदाचा प्रजासत्ताक दिन हा ७३ वा असून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचालनाला उशिरा सुरुवात होणार आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने परेड सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि त्याच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉलमुळे परेडला अर्धा तास उशिर होईल. दरवर्षी परेड सकाळी १० वाजता सुरु होते. मात्र यावेळी ती साडेदहा वाजता सुरु होणार आहे.

Republic Day parade
कोरोनाचा संसर्ग वेगाने, चाचण्या वाढवा; केंद्राचे राज्यांना निर्देश

५ ते ८ हजार जणांना उपस्थितीसाठी परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या ७० ते ८० टक्के कमी असणार आहे. प्रत्यक्ष सोहळ्यात ५ ते ८ हजार जणांनाच सहभागी होता येईल. गेल्या वर्षी २५ हजार लोकांना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

परदेशी पाहुण्यांशिवाय सोहळा

दरम्यान, दरवर्षी इतर काही देशांच्या राष्ट्राध्यक्ष, प्रमुखांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. सरकारने पाच मध्य आशियाई देशांना यावेळी आमंत्रण पाठवले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्यांना बोलावण्यात येणार नाही. गेल्यावर्षीसुद्धा एकही परदेशी पाहुणा उपस्थित नव्हता.

६०० कलाकारांचे सादरीकरण

यंदा राजपथावर जवळपास ६०० युवा कलाकार त्यांचे सादरीकरण करतील. संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर वंदे भारत स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामधून या ६०० जणांची निवड करण्यात आली आहे. देशभरातील लोकांचा सहभाग वाढावा आणि तरुणांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com