राजपथावर 'शिल्का' गन ऑपरेट करणार प्रिती; संधीबद्दल म्हणाली, महिला म्हणून नव्हे तर..

टीम ई सकाळ
Saturday, 23 January 2021

राजपथावरील परेडमध्ये लष्कराची अँटी एअरक्राफ्ट गन अपग्रेडेड शिल्कासुद्धा दिसेल. पहिल्यांदाच राजपथावर परेडचा भाग होण्यासाठी शिल्काला अपग्रेड करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये भारतीय लष्कर आपली ताकद दाखवणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणावाचं वातावरण असताना जी शस्त्रे, टँक आणि क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली होती ती सर्व प्रजासत्ताक दिनी राजपथावर दिसणार आहेत. यावर्षी 26 जानेवारीच्या राजपथावरील परेडमध्ये लष्कराची अँटी एअरक्राफ्ट गन अपग्रेडेड शिल्कासुद्धा दिसेल. पहिल्यांदाच राजपथावर परेडचा भाग होण्यासाठी शिल्काला अपग्रेड करण्यात आलं आहे. याची कमांडिंग ऑफिसर कॅप्टन प्रिती चौधरी असेल. 

राजपथावर यावेळी अपग्रेडेड एअरक्राफ्ट गन शिल्काची ताकदही बघायला मिळेल. जमीनीपासून 2 किमी अंतरापर्यंत शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची क्षमता यामध्ये आहे. तसचं शिल्का हवेत 2.5 किलोमीटर अंतरावर शत्रूचा वेध घेऊ शकते. कॅप्टन प्रिती चौधरी यांनी सांगितलं की, रेजिमेंटची उपकरणं परेडमध्ये असल्यानं मला यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. फक्त महिला आहे म्हणून या परेडमध्ये आहे असं नाही. केवळ एक महिला असल्याच्या कारणामुळे आपल्याला संधी दिली असं नाही तर रेजिमेंटची उपकरणे यात आहेत आणि ती हाताळण्याची कौशल्ये असल्यानं मला संधी दिली असल्याचं तिनं सांगितलं.

परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिमान वाटतो असंही प्रिती चौधरी यांनी म्हटलं. ती एनसीसीच्या एअरविंगची कॅडेट होती. लष्करात येण्यासाठी तिने वडिलांना आदर्श मानलं. प्रितीचे वडिल मानद कॅप्टन इंदर सिंह हे लष्कराच्या मेडिकल कोअऱमध्ये होते. 2014 मध्ये इंदर सिंह निवृत्त झाले होते. राजपथावर परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रिती स्वत:ला खूपच नशीबवान समजत आहे. 

हे वाचा - 'तुम्हाला हे शोभत नाही'; PM मोदींच्या व्यासपीठावर जय श्रीराम ऐकताच ममतादीदी भडकल्या

वडिलांचा लष्करी गणवेश पाहून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालण्याची प्रितीची इच्छा होती. तिने एनसीसी एअर विंग जॉइन केली होती. त्यानंतर 2016 मध्ये दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात हरियाणाच्या तुकडीमध्ये तिचा समावेश होता. देशातील 144 मुलींमध्ये तिला ऑल इंडिया बेस्ट कॅडेट म्हणून निवडण्यात आलं होतं. त्यावेळी प्रितीचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरवही झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: republic-day-parade schilka to roll down rajpath for 1st time