
अखिलेश यादव एका कार्यक्रमात बोलत होते
लखनऊ- समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मंगळवारी दावा केलाय की 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी सरकार बनवेल. भाजप शेतकऱ्यांना रस्त्यावर घेऊन येईल आणि हे सरकार जाईल तेव्हाच लोकशाही वाचेल, असं ते म्हणाले. पक्षाच्या एका कार्यक्रमात अखिलेश यादव बोलत होते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; चांदीच्या भावातही किरकोळ वाढ
भारतीय जनता पक्षाने अन्याय आणि अत्याचाराची सर्व सीमा पार केली आहे. कोणी आवाज उठवतो, तेव्हा त्याचा आवाज दाबण्याचे काम सरकार करते. भाजप सरकार जाईल तेव्हाच लोकशाही वाचेल, असं अखिलेश म्हणाले आहेत. अखिलेश यादव यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
अखिलेश यादव यांनी मंगळवारी ट्विट करत भाजपला लक्ष्य केलं होतं. भाजप सरकारने शेतकऱ्यांसोबत ठरलेला चर्चेचा दिवस पुढे ढकलून सिद्ध केलंय की त्यांना त्यांची काळजी नाही. शेतकरी तेथे थंडीत राहात आहेत. भाजप सरकार केवळ शेतकऱ्यांचा द्वेष करत आला आहे. शेतकरी विरोधक भाजप त्यांना रस्त्यावर घेऊन येईल, असं ते म्हणाले आहेत. भाजप शेतकऱ्यांचा छळ करत आहे. इतका खोटेपणा आणि भ्रष्टाचार कोणत्याही सरकारमध्ये पाहिला नाही. भाजप सरकार कोणासोबत काहीही करु शकते, असंही अखिलेश म्हणाले.
'कुणाला काही प्रॉब्लेम असल्यास मला अनफॉलो करा'
समाजवादी पार्टी शेतकरी आंदोलनात त्यांच्यासोबत उभी आहे. सरकारने सर्वात जास्त खोटे गुन्हे समाजवादी पार्टीच्या नेत्यांवर लावले आहेत. सपा सर्वांना सोबत घेऊन चालेल, तसेच छोट्या पक्षांना आमचे दरवाजे खुले राहतील. भारत सरकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था नष्ट होत आहे. नोटबंदी आणि लॉकडाऊन हे त्याचे उदाहरणे आहेत, असा आरोप अखिलेश यांनी केला.
लॉकडाऊनच्या काळात पायी चालत घरी परतणाऱ्या 90 पेक्षा अधिक मजूरांचा मृत्यू झाला, पण सरकारने त्यांची कसलीही मदत केली नाही. भाजप दुसऱ्या पक्षांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करते. पश्चिम बंगालमध्येही हेच होत आहे. उत्तर प्रदेशातही हेच झाल्याचं अखिलेश म्हणाले. त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला भाजपला हरवण्याचे आवाहन केले.