खासगी बाजारात लशीची किंमत किती असेल? अदर पुनावाला यांनी दिली माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 4 January 2021

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (The Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी (Adar Poonawalla) कोरोना लशीसंबंधात (Coronavirus Vaccine) महत्त्वाची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (The Serum Institute of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी (Adar Poonawalla) कोरोना लशीसंबंधात (Coronavirus Vaccine) महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने कोरोना लस कोविशिल्ड बाजारात विकण्याची परवानगी दिली, तर या डोसची किंमत 1000 रुपये असेल असं पुनावाला म्हणाले आहेत. सरकारसाठी आम्ही लस खास किंमतीमध्ये देऊ. पहिल्या 10 कोटी लशींची किंमत 200 रुपये प्रती डोस असतील, त्यानंतर वेगवेगळ्या किंमतीमध्ये ती विकण्यात येईल, असंही ते म्हणाले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

भारतीय वस्तूंचा दर्जा आणि विश्वासार्हता वाढवायला हवी- पंतप्रधान मोदी

आम्ही जे काही सरकारला देत आहोत, ते भारतीय लोकांना मोफतमध्ये देण्यात येईल. त्यानंतर जेव्हा आम्ही लस खासगी बाजारात आणू तेव्हा त्याची किंमत 1 हजार रुपये असेल. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस घ्यावे लागतील, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सीरमच्या कोविशिल्ड लशीसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये मोजावे लागतील, असं अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं. तसेच लस गरजवंतांना मिळावी यासाठी प्राथमिकतेने विचार केला जाईल, असं ते म्हणाले.

मला आशा आहे सर्व कार्यवाही पुढील 7 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर जास्तीत जास्त पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील एक महिन्यात 7 ते 8 कोटी डोसचा सप्लाय केला जाईल, असं पुनावाला म्हणाले. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मार्च महिन्यापर्यंत लशींचे उत्पादन दुप्पट करेल, पण बाजारात याची उपलब्धता कशी ठेवायची याबाबत सरकार निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. 

Record Break; सेन्सेक्स पहिल्यांदाच 48 हजार अंकांच्या पुढे, निफ्टीनेही गाठला 14...

दरम्यान, भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड (covishield) आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (covaxine) या लशींचा समावेश आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लस बनवण्यात आघाडीवर होती. सीरम ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकासोबत मिळून लशीचे उत्पादन करत आहे. सीरम जे काही उत्पादन देशात करेल, त्यातील अर्धा भाग भारतीयांसाठी राखीव असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. सीरमची लस लवकर उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Serum Institute of India ceo Adar Poonawalla said about covaxine pries