Positive Story:भारतात उपलब्ध होणार अर्धा डझन कोरोना लशी!

टीम ई-सकाळ
Friday, 23 October 2020

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण, सीरममध्ये ऑक्सफर्डच्या Covidshieldसह आणखी चार लशींच्या उत्पादनाचे काम सुरू आहे.

पुणे : कोरोनाच्या रुग्णांची संख्या भारतात कमी होत असली तरी, कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळं कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. भारतात कोरोनाच्या लशीवर युद्धपातळीवर काम सुरू असून, त्याच्या मानवी चाचण्याही सुरू आहेत. भारतात एक-दोन नव्हे तर, सहा कोरोना लशी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येच (SII)पाच लशीचं उत्पादन होत असल्याची माहिती आहे. या पाच लशींचे 100 कोटी डोस तयार करण्याचं काम सीरम करत आहे.

आणखी वाचा - जेव्हा पाकिस्ताननं काश्मीरमध्ये पहिल्यांदा घुसखोरी केली

सीरममध्येच पाच लशीचं उत्पादन
पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण, सीरममध्ये ऑक्सफर्डच्या Covidshieldसह आणखी चार लशींच्या उत्पादनाचे काम सुरू आहे. यात Covovax, COVIVAXX, COVI-VAC, आणि सीरमच्याच COVAX या लशीचा समावेश आहे. त्याचबरोबर भारत बायोटेकच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला काल मंजुरी मिळाल्यानं भारतात एकूण सहा लशीचं उत्पादन सुरू आहे. त्या लशी एकाच वेळी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  

आणखी वाचा - एमआयचे 15 कोटींचे मोबाईल लंपास; मोठा दरोडा

महिन्याला 3 लाख डोस
कोणती लस पहिल्यांदा उपलब्ध होणार, याविषयी उत्सुकता आहे. त्यात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या हवाल्याने नवभारत टाईम्सने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, ऑक्सफर्ड आणि अंत्राझेनका यांची कोविडशिल्ड ही लसच पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे. भारतातील 1600 जणांवर याची मानवी चाचणी झाली आहे. सध्या सीरममध्ये या लशीची महिन्याला 3 लाख डोस तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात हे उत्पादन 7 ते आठ लाखांच्या घरात नेण्यात येणार आहे. यासह सीरम इन्स्टिट्यूटच्या 'Covovax'या लशीचं उत्पादनही युद्ध पातळीवर सुरू आहे. सध्या या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे. 

आणखी वाचा - कोरोना लशीसाठी 50 हजार कोटी?

रशियाच्या लशीची भारतात चाचणी 
भारताने रशियाची कोरोना लस Sputnik Vयाच्या मानवी चाचणीला परवानगी दिली आहे. भारतातील 100 स्वयंसेवकांना या लशीचे डोस देण्यात येणार आहेत. या लशीविषयी जगभरातील शास्त्रज्ञांनी शंका उपस्थित केली होती. कारण, याच्या मानवी चाचणीचा डेटा उपलब्ध नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या लशीची घोषणा केली तसेच आपल्या मुलीला ही लस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute working 100 crore doses of 5 covid vaccines