जय सियाराम; श्रीराम मंदिराचे अयोध्येत भूमिपूजन

अयोध्या - राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. भूमिपूजनानंतर त्यांनी तेथील माती कपाळावर लावली. यावेळी (उजवीकडे) सरसंघचालक मोहन भागवत, गोविंददेवगिरी महाराज.
अयोध्या - राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. भूमिपूजनानंतर त्यांनी तेथील माती कपाळावर लावली. यावेळी (उजवीकडे) सरसंघचालक मोहन भागवत, गोविंददेवगिरी महाराज.

अयोध्या - राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली ऐतिहासिक अयोध्यानगरी आज एका नव्या पर्वाची साक्षीदार ठरली. तब्बल ४२९ वर्षांचा वाद संपुष्टात येऊन आज रामलल्लाच्या भव्यदिव्य मंदिर उभारणीस भूमिपूजनाद्वारे सुरवात झाली. वेद मंत्रांच्या घोषात, संत-महंतांच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३२ वर्षे जुन्या नऊ शिळांचे पूजन करत ‘राम’काज सुरू केले.  जगभरातील कोट्यवधी रामभक्तांनी दूरचित्रवाणीवरून राम मंदिराचा हा भूमिपूजन सोहळा पाहिला. देशासह सातासमुद्रापार अमेरिकेत देखील असंख्य राम भक्तांनी ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय बजरंग बली’च्या घोषणा देत मिठाई वाटत आनंद व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण देखील आज सर्वार्थाने ऐतिहासिक ठरले. अयोध्येत उभे राहत असलेले रामाचे मंदिर हे सामाजिक एकोप्याचा संदेश देईल, असा आशावाद व्यक्त करतानाच मोदींनी राम हे सर्वांचे असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणामध्ये पाचशे वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले असून हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, या मंदिरामुळे देशाला आत्मनिर्भर बनण्यासाठीचा आत्मविश्‍वास मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

या कार्यक्रमाला मोदींसोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे मान्यवर देखील उपस्थित होते.

कोरोनाच्या संसर्गामुळे आज मुख्य कार्यक्रमस्थळी स्वच्छतेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सर्वच प्रमुख पाहुण्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क घातले होते.

पहिले पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानगढीवर पूजा  केल्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेतले, असे करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. यापूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना अयोध्येत आले होते, पण त्यांनी दर्शन घेतले नव्हते. रामलल्लाला वंदन केल्यानंतर ते मुख्य भूमिपूजन सोहळ्याच्या स्थळाकडे रवाना झाले. या ठिकाणी देखील सरसंघचालकांसह काही मोजकेच लोक उपस्थित होते.

देशभर दिवाळी
आज दुपारी अयोध्येमध्ये भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर सायंकाळी उत्तरप्रदेशसह देशभर दिवाळी साजरी करण्यात आली. अयोध्येतील शरयू नदीचा तीर, विविध देवी-देवतांची मंदिरे रोषणाईने उजळून निघाली होती. अनेक ठिकाणांवर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यांत शेकडो रामभक्तांनी आज मिठाईचे वाटप केले. अयोध्येमध्येही रामभक्तांना मोतीचूर लाडवांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

  • मंदिर परिसरात पारिजातकाच्या रोपट्याचे रोपण
  • चांदीच्या नऊ शिळांचे मोदींकडून पूजन
  • १२ वाजून ४४ मिनिटे ९ सेकंद या मुहूर्तावर भूमिपूजन
  • शृंगेरीच्या शंकराचार्यांनी पाठविले भूमिपूजनाची माहिती सांगणारे ताम्रपत्र
  • भूमिपूजनासाठी प्रतिकात्मक चांदीच्या कुदळ फावड्याचा वापर
  • मंडपामध्ये १७५ जण उपस्थित

गंगाधरशास्त्री पाठक पुरोहित
राम मंदिर भूमिपूजनाचे पौरोहित्य मिथिला येथील पंडित गंगाधरशास्त्री पाठक यांनी केले. मिथिला नगरी हे देवी सीतेचे माहेर आहे. पाठक हे वैदिक विधींमधील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. सध्या ते वृंदावनमध्ये वास्तव्यास असतात. आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी काटेकोर नियोजन आखले होते. या भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य करण्याची संधी मिळाल्याने आपण धन्य झालो, असे त्यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

शंभर नद्यांचे पाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामजन्मभूमी येथे पोचताच पूजा सुरू झाली. या वेळी २००० ठिकाणांहून आणलेली माती आणि शंभराहून अधिक नद्यांचे पाणी पूजेच्या ठिकाणी ठेवण्यात आले. १९८९ मध्ये जगभरातून दोन लाख ७५ हजार विटा मंदिरासाठी आल्या होत्या. त्यापैकी नऊ विटा भूमिपूजनाच्या वेळी मांडण्यात आल्या. पूजनानंतर मोदींनी संकल्प सोडला.

४८ मिनिटे पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत पूजा केली. यादरम्यान त्यांनी चांदीच्या चार शिलांचे पूजन केले. दुपारी १२ वाजता भूमिपूजन सुरू झाली. ही पूजा ४८ मिनिटे चालली. अभिजित मुहुर्तावर भूमिपूजन आणि शिलापूजन झाल्यानंतर मोदी यांनी साक्षात दंडवत घातले. पंतप्रधानांनी देशाचा विकास आणि कोरोनाचा नायनाट यासाठी श्रीरामाकडे आशीर्वाद मागितले.  

व्हाया हाँगकाँग अयोध्या
भूमिपूजनासाठी पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील पवित्र शारदापीठ येथील मातीही आणण्यात आली होती. चीनमध्ये राहणारे भारतीयवंशाचे रमण आणि त्यांच्या पत्नीला चीनच्या पासपोर्टवर पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये पाठवण्यात आले. हे कुटुंब हाँगकाँगहून पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरची तथाकथित राजधानी मुझफ्फराबाद येथे पोचले. तेथे पोचल्यानंतर ते शारदा पीठाकडे गेले. तेथून प्रसाद आणि माती घेऊन हाँगकाँगमार्गे दिल्लीला पोचले. 

अमेरिकेत मिरवणूक
अयोध्येत भूमिपूजन झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ अमेरिकेतील भारतीयांनी दिवे प्रज्वलित केले व मंदिराच्या डिजिटल प्रतिमेची ट्रकमधून मिरवणूक काढली. अमेरिकेत कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने अनेक ठिकाणच्या हिंदू समाजातील नागरिकांनी यानिमित्त व्हर्च्युअल कार्यक्रमांचे आयोजन आज केले होते. वॉशिंग्टनमध्ये विश्‍व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी श्रीरामाच्या जयघोषात मंदिराच्या डिजिटल प्रतिमेची मिरवणूक काढली. 

राममंदिराचे भूमीपूजन हे भारताच्या सामाजिक सद््भावनेचे उत्तम प्रतीक आहे.
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

अयोध्येतील राममंदिराची निर्मिती ही धार्मिक मुद्यापेक्षाही जास्त महत्त्वाची असून राजा रामाने स्थापन केलेल्या उच्च मानवी मूल्यांची पुनर्स्थापना करण्याची उत्तम संधी आहे.
- एम. वेंकय्या नायडू , उपराष्ट्रपती

असंख्य ज्ञात-अज्ञात रामभक्तांनी शतकानुशतके केलेला त्याग, तपश्‍चर्या व बलिदानाचा हा दृश्‍य परिणाम आहे.
- अमित शहा, गृहमंत्री  

मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम सर्वोत्तम मानवी गुणांचे स्वरुप आहे. आपल्या मनात असलेल्या मानवतेची मूळ भावना म्हणजे राम आहे. राम प्रेम आहे. राम करुणा आहेत. ते क्रौर्यामध्ये प्रकट नाही होऊ शकत. राम न्याय आहे, ते अन्यायात प्रकट होऊ शकत नाही.
- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

अनेक पिढ्यांचे आणि जगभरातील राम भक्तांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामच्या मंदिराचे पुनर्निर्माण होत आहे, भूमिपूजन होत आहे, याचे सर्वांत मोठे श्रेय लालकृष्ण अडवानी यांना आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनाही याचे श्रेय जाते. आज प्रत्येक श्‍वासातून जणू ‘जय श्रीराम’ नाद ऐकू येत आहे.
- लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com