भारत-चीन सीमेवर परिस्थिती गंभीर; क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात

Satellite imagery
Satellite imagery

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. गलवानच्या संघर्षानंतर चीनकडून प्रत्यक्ष ताबारेषेच्या परिसरात (एलएसी) लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढलेल्या असताना त्यांना चाप बसवण्यासाठी भारताने पूर्व लडाख भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. भारताकडून लडाखच्या सीमावर्ती भागात अतिदक्षता बाळगली जात असून, चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. सरकारी सूत्राने म्हटले, की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे विमान आणि हेलिकॉप्टरनी प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पिटाळून लावण्यासाठी आणि पाडण्यासाठी भारताने पूर्व लडाख भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केली. या सज्जतेमुळे सीमेवर जवानांचे बळ आणि सामर्थ्य आणखी वाढणार आहे. याशिवाय भारताला लवकरच एका मित्र देशाकडून शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा मिळणार असून, ती यंत्रणादेखील तैनात केली जाणार आहे. या यंत्रणेमुळे लडाखच्या संपूर्ण भागाचे संरक्षण होईल. शत्रूच्या कोणत्याही विमानाचा मुकाबला करता येणार आहे.

चीनची हेलिकॉप्टर्स सध्या प्रत्यक्ष ताबारेषेजवळ घिरट्या घालत आहेत. एवढेच नाही, तर संवेदनशील भागातही चिनी हवाईदलाची विमाने उड्डाणे घेत आहेत. यात सब सेक्टर नॉर्थ (दौलत बेग ओल्डी सेक्टर), गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट १४, १५, १७ आणि १७ ए (हॉट स्प्रिंग एरिया), याशिवाय पँगाँग त्सो, फिंगर ३ परिसराचा समावेश आहे. चीनच्या मुकाबल्यासाठी भारताच्या अतिवेगवान क्षेपणास्त्रांत आकाश क्षेपणास्त्राचा समावेश असून, ते वेगाने उडणाऱ्या शत्रूच्या विमानाला आणि ड्रोनला काही सेंकदांतच भेदू शकते. पर्वतरांगांत तैनात करण्यापूर्वी त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

आजही हवाई दलच्या घिरट्या
पूर्व लडाख भागात आजही भारतीय हवाई दलाच्या विमानांनी घिरट्या घातल्या. परिसरातील हवाई तळावरून उड्डाण घेणारी लढाऊ विमाने सज्ज असून गरज पडल्यास कोणताही क्षण न गमावता आपले लक्ष्य भेदण्यास सज्ज आहेत. भारताची टेहळणी यंत्रणाही शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषेकडे घुसखोरी केली, तेव्हा भारताने एसयू-३० एमकेआयला पूर्व लडाखमध्ये तैनात केले होते. काही दिवसांपासून चीनकडून दावा केल्या जाणाऱ्या भागात चीनची हेलिकॉप्टर्स घिरट्या घालत आहेत. विशेष म्हणजे गलवान खोऱ्यात तर एका बांधकामाच्या ठिकाणीदेखील चीनचे हेलिकॉप्टर येत आहे.

चिनी सैन्य अद्यापही गलवान खोऱ्यातच?
नवी दिल्ली : सैन्य माघारीचा व शांतता राखण्याचा निर्णय होऊनही चीनचा आडमुठेपणा कायम असून, गलवान नदीजवळ चिनी सैन्याचा तळ स्पष्ट करणाऱ्या ताडपत्र्या नव्या उपग्रह छायाचित्राद्वारे टिपण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष ताबारेषेच्या आत नऊ किलोमीटरपर्यंत चीनचे सोळा तळ असल्याचेही या छायाचित्रांतून दिसत असल्याचा दावा सूत्रांनी केला.  

चीनने ठरल्याप्रमाणे सैन्य माघारी घेतलेले नाही, उलट त्यांचे मोठ्या प्रमाणावर सैन्य गलवान खोऱ्यातच तळ ठोकून असून, त्याचा भारतीय जवानांना थेट धोका असल्याचे उपग्रह छायाचित्रांतून दिसत आहे. ‘प्लॅनेट लॅब्ज्‌’कडून मिळालेली ही छायाचित्रे २५ आणि २६ जूनला कढण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये भारतीय जवानांनी गलवान नदीजवळ बांधलेली दगडांची भिंत दिसत असली तरी त्यांचे तळ मात्र कोठेही दिसत नाहीत. गलवान नदीच्या वळणावरच चीनचे तळ दिसत असून, यावरून चीनची घुसखोरी स्पष्ट होत असल्याची शंका सूत्रांनी व्यक्त केली आहे. या तळांवर चिनी सैन्याचे ट्रक, बुलडोझर दिसत आहेत. व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला लडाखमधील दुर्बक-दौलत बेग ओल्डी महामार्ग चिनी तळांपासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर आहे. या महामार्गामुळे भारतीय जवानांना गलवान खोऱ्यात सहज पोहोचता येत असल्याने चीनने त्याला विरोध केला होता. गलवानमधील चीनच्या संशयित घुसखोरीला या घटनेचाही संदर्भ असावा, अशीही शंका व्यक्त होत आहे. हाच महामार्ग पुढे काराकोरम खिंडीत जातो. अक्साई चीनमधील चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या खिंडीचा भारत उपयोग करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com