काय आहे राजीव गांधी फाउंडेशन? चीनकडून पैसे घेतल्याचा भाजपने केलाय आरोप

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

राजीव गांधी फाउंडेशनला (RGF) चीनने निधी दिल्याच्या आरोपानंतर काँग्रेसला घेरले जात आहे.

नवी दिल्ली - राजीव गांधी फाउंडेशनला (RGF) चीनने निधी दिल्याच्या आरोपानंतर काँग्रेसला घेरले जात आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दावा केला होता की  RGF ला चीनने निधी दिला. काँग्रेसनं हे सांगावं की इतकं प्रेम कसं वाढलं. काँग्रेसच्या कार्यकाळात चीनने आपल्या जमीनीवर कसा ताबा मिळवला. एका कायद्यानुसार कोणताच पक्ष सरकारच्या परवानगीशिवाय परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. काँग्रेसनं स्पष्ट करावं की या निधीसाठी सरकारकडून मंजुरी घेतली होती का? असे अनेक प्रश्न काँग्रेसला सध्या विचारले जात आहेत. भाजपकडून दावा केला जात आहे की त्यांच्याकडे 2005-06 ला आरजीएफला दान केलेल्यांची यादी आहे. यामध्ये चीनच्या दुतावासाकडून निधी मिळाल्याचा उल्लेख आहे. यावरूनच राजीव गांधी फाउंडेशनला घेरलं जात आहे. या फाउंडेशनची स्थापना कशासाठी केली होती आणि यातून काय कार्य करण्यात आलं याची माहिती आपण घेऊ. 

RGF ची स्थापना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी 1991 मध्ये करण्यात आली होती. फाउंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार 1991 ते 2009 पर्यंत फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, साक्षरता, विज्ञान, उद्योग, महिला आणि बालविकास, असहाय लोकांना मदत, वाचनालयासह अनेक समाजोपयोगी कामे करण्यात आली.

हे वाचा - मेहुल चोकसीकडून पैसे का घेतले? भाजपचा काँग्रेसला सवाल

फाउंडेशनने 2011 मध्ये प्रामुख्याने शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय केला. तसंच पहिल्यापासून सुरु असलेली कामेही चालू ठेवली. यामध्ये इंटरअॅक्ट (संघर्षाच्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शैक्षणिक मदत करण्याची योजना), राजीव गांधी अॅक्सेस टू ऑपॉर्च्युनिटीज योजना (शारिरीकदृष्ट्या सक्षम नसलेल्या तरुणांसाठी), राजीव गांधी केंम्ब्रिज स्कॉलरशिप प्रोग्रॅम (भारतीय विद्यार्थ्यांना केंब्रिजमध्ये शिकण्यासाठी अर्थसहाय्य), नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी, तसंच मुलांसाठी वाचनालय आदींचा समावेश आहे.

चीनकडून देणगी मिळाल्याच्या आरोपावर काँग्रेसने केला खुलासा

फाउंडेशनचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. तर इतर कार्यकारी मंडळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग, पी चिदंबरम, मोंटेक सिंग अहलूवालिया, सुमन दुबे, राहुल गांधी, डॉक्टर शेखर राहा, प्रो, एम एस स्वामीनाथन, डॉक्टर अशोक गांगुली, संजीव गोयंका आणि प्रियांका गांधी हे आहेत. राजीव गांधी फाउंडेशनच्या स्थापनेला 21 जून 2020 रोजी 29 वर्षे झाली. त्यावेळीच पाच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑगस्ट 1991 मध्ये राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी स्टडीजच्या रुपाने थिंक टँकची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर नवी दिल्लीतील जवाहर भवन इथं कार्यालयही उभारण्यात आलं होतं.

बेंगळुरुत नॅशनल लॉ स्कूल युनिव्हर्सिटीमध्ये वाद विवाद स्पर्धेमध्ये दोन पुरस्कार विजेत्यांना 50 हजार रुपयांचा राजीव गांधी पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी वाद विवादाचा विषय अमेरिका आणि भारतात बौंद्धिक संपत्तीचा अधिकार हा होता. 17 आणि 18 नोव्हेंबर 1991 ला मुंबई, मद्रास, कोलकाता आणि नवी दिल्ली मध्ये एनजीओंच्या मदतीने एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय दिव्यांगांना आवश्यक उपकरणे देण्यात आली होती. भारतातील अनेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीसाठी फळे आणि बिया पुरवण्यासाठी ट्री फॉर लाइफ संस्थेची मदत घेतली होती. 

नेहरू आणि मोदी : तेच ते आणि तेच ते (श्रीराम पवार)

उत्तर काशीमध्ये भूकंप पीडीतांसाठीही फाउंडेशनने मदत केली होती. बूढा केदार ब्लॉक आणि जठोली ब्लॉकमधील 100 कुटुंबाममध्ये 5.56 लाख रुपयांचे साहित्य वाटले होते. रेल्वेगाडीत रुग्णालयाप्रमाणे लाइफ लाइन एक्सप्रेस विकसित कऱण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण बागातील लहान स्टेशन्सवर मोफत वैद्यकीय तपासणीची सेवा दिली जात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why and when rajiv gandhi foundation which targeted by bjp for take donation from china