देशभरात आतापर्यंत तब्बल एवढ्या श्रमिकांची झाली घरवापसी

सुरत - गावी जाण्यासाठी स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात येत असून शनिवारी स्थानकावर नेणाऱ्या बसची वाट पाहताना नागरिक.
सुरत - गावी जाण्यासाठी स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात येत असून शनिवारी स्थानकावर नेणाऱ्या बसची वाट पाहताना नागरिक.

नवी दिल्ली - लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. गेल्या चार दिवसांत २६० श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांद्वारे दररोज सरासरी तीन लाख कष्टकऱ्यांना त्यांच्या घरी पोचविण्यात आले आहे. आतापर्यंत २ हजार ६०० हून अधिक श्रमिक स्पेशल गाड्यांद्वारे ३५ लाखांहून अधिक प्रवाशांची घरवापसी झाल्याचा दावा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज केला. यापैकी  ८० टक्के रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश आणि बिहारला पोचल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनोदकुमार यादव यांनी सांगितले, की ‘‘ एक मे पासून श्रमिक स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या. यामध्ये सर्व प्रवाशांना मोफत भोजन आणि पाण्याचीही व्यवस्था केली जात आहे. गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवरही स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. रेल्वेची १७ रुग्णालये कोविड -१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरली जात असून यासोबतच पाच हजार डबे (कोच) कोविड -१९ केअर सेंटर बनविण्यात आले. त्यात ८० हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील ५० टक्के डब्यांचा वापर श्रमिक स्पेशल गाड्यांसाठी करण्यात आला. या डब्यांचे आता कोरोना केअर सेंटर बनविण्यात येईल.’’

एक मे पासून ते आतापर्यंत २६०० श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांनी ३५ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे. पुढील दहा दिवसांत आणखी २६०० श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

त्याद्वारे ३६ लाख स्थलांतरीतांना त्यांच्या निवासी राज्यांमध्ये पोहोचविण्यात येईल. यासाठी रेल्वेने राज्यांची आवश्यकता विचारली असल्याचेही विनोदकुमार यादव म्हणाले.१ जूनपासून २०० मेल एक्स्प्रेस गाड्या सोडल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  दरम्यान, केंद्राने स्थलांतरीत मजुरांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय केल्याचा दावा गृहखात्याच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी यावेळी केला.

केंद्राने राज्यांना मजुरांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानंतर २४ तासाची हेल्पलाइन आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सद्यस्थितीत रेल्वेच्या दररोज २०० हून अधिक गाड्या सुरू असल्याकडे पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, श्रमिक स्पेशल वगळता रेल्वेने १५ शहरांसाठी विशेष गाड्या देखील सुरू केल्या आहेत. तर १ जूनसाठी सुरू होणाऱ्या २०० गाड्यांसाठीची तिकिट बुकिंग २१ मे पासून सुरू झाली आहे. यामध्ये प्रवाशांना ऑनलाईन तसेच तिकिट खिडकीवर देखील तिकिट खरेदी कता येईल. या व्यतिरिक्त आयआरसीटीसीने अधिकृत केलेले एजंट, सेवाकेद्र, पीआरएस केंद्र, टपाल कार्यालयांमार्फतही तिकिट विक्री सुरू झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com