esakal | मॉन्सून पुन्हा सक्रीय; केरळातील काही जिल्ह्यांसाठी रेड अ‍ॅलर्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

मॉन्सून पुन्हा सक्रीय; केरळातील काही जिल्ह्यांसाठी रेड अ‍ॅलर्ट!

sakal_logo
By
अमित उजागरे

थिरुवअनंतपुरम : बंगालच्या उपसागरातून पूर्वेकडे जमीनीलगत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थीती तयार झाली आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागांसह मध्य महाराष्ट्रात शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान, केरळमधील काही किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (Southwest monsoon revives IMD sounds red alert in some Kerala districts)

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडीशा, गुजरात आणि अंदमान आणि निकोबार बेटं नैऋत्य मॉन्सूनच्या प्रभावाखाली येणार आहे. नैऋत्य भागात, तसेच अरबी समुद्रातील पश्चिम-मध्य आणि ईशान्य भागात गुजरातच्या किनारी भागात, लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकची किनारपट्टी तसेच दक्षिण बंगालचा उपसागर या भागात सुमारे ६० किमी प्रतितास या वेगानं तीव्र वारे वाहतील असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

हेही वाचा: पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे बनवली सोलर सायकल; बॅटरी संपली तरी 20 किमी धावणार

दरम्यान, हवामान विभागानं केरळच्या कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाच्या इशाऱ्यासह रेड अॅलर्ट जाहीर केला आहे. तर कोट्टायम, इडुक्की, मल्लापुरम, कोझिकोडे आणि कन्नूर या भागाला ऑरेंज अॅलर्ट तर थिरुवअनंतपूरम, कोल्लम आणि पथनमथित्ता या जिल्ह्यांना येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच हवामान खात्याच्या बुलिटननुसार, अंदमान आणि निकोबार बेटे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि चंदिगड या या भागात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटांसह मोठ्या प्रमाणावर पावसाचा इशारा दिला आहे. तर दिल्लीतही शनिवारी साधारण पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जाहीर

कोकण भागात हवामान खात्यानं ऑरेंज अॅलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये येणाऱ्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात रविवारपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

loading image