esakal | श्रीनगर सेक्टरच्या आयजीपदावर IPS चारू सिन्हा; इतिहासात पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

charu sinha

चारू सिन्हा यांनी याआधी सीआरपीएफमध्ये बिहारमधील नक्षलग्रस्त भागात आयजी म्हणून काम केले होतं. तिथं नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव होता, तरीही त्यांनी तिथं उत्तम केलं होतं.

श्रीनगर सेक्टरच्या आयजीपदावर IPS चारू सिन्हा; इतिहासात पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर - जगभरासह भारतात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वाटा वाढत आहे. आज सगळ्याच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. भारतीय लष्करातही काही अपवाद वगळता  प्रत्येक विभागात  महिला कार्यरत असून त्या उत्कृष्ट काम करत आहेत. अशातच जम्मू-काश्मीरमधून एक महत्वाची बातमी आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी (इन्स्पेक्टर जनरल -आयजी) एका महिलेची निवड झाली आहे. श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी चारु सिन्हा या महिला आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. सीआरपीएफचा श्रीनगर सेक्टर हा नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर असतो. चारु सिन्हा या 1996 मधील तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. 

आयपीएस अधिकारी चारू सिन्हा या सीआरपीएफसाठी श्रीनगर क्षेत्रात  महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या भागात नेहमीच दहशतवादी कारवाया होत असतात. अशा भागात काम करणे खूप धोकादायक आहे. पण अशी पहिली वेळ नाही जेव्हा चारू सिन्हांवर इतकं कठीण काम सोपविण्यात आले आहे. चारू सिन्हा यांनी याआधी सीआरपीएफमध्ये बिहारमधील नक्षलग्रस्त भागात आयजी म्हणून काम केले होतं. तिथं नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव होता, तरीही त्यांनी तिथं उत्तम केलं होतं. सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली नक्षलग्रस्त भागात विविध कारवाया करण्यात आल्या होत्या. बिहारमधल्या कामाची धडाडी पाहून चारू सिन्हा यांना जम्मू भागात सीआरपीएफमध्ये महानिरीक्षपदी नियुक्त केलं गेलं होतं. जम्मू भागात त्यांनी दीर्घ आणि यशस्वी कार्यकाळ संपविला. त्यानंतर आता सोमवारी, सिन्हा यांची श्रीनगर सेक्टरच्या नवीन महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. 

हे वाचा - चीनने पैंगोगच्या उत्तर भागात जे केलं, तेच भारताने दक्षिणेत करत दिलं प्रत्युत्तर

सध्याचे सीआरपीएफचे महासंचालक एपी माहेश्वरी यांनी  2005 मध्ये श्रीनगर सेक्टरचे पहिले महानिरीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. या विभागाची निर्मिती 2005मध्ये झाली होती.  या विभागाच्या प्रमुखपदी अजुनपर्यंत कोणत्याच महिलेची निवड झाली नव्हती. या क्षेत्रातील सीआरपीएफचे काम जम्मू-काश्मीर पोलिस आणि भारतीय सैन्याच्या सहयोगाने चालते. 
 
केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF) भारतीय पोलीस संस्थेचे एक घटक आहे. हे संघटन भारत सरकारच्या गृहमंत्रालयच्या आदेशानुसार काम करते. केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना २७ जुलै १९३९ ला करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर 28 डिसेंबर 1949 रोजी संसदेच्या कायद्याद्वारे या दलाचे नाव केंद्रीय राखीव पोलिस दलाचे नामकरण करण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी नव्या स्वतंत्र राष्ट्राच्या बदलत्या गरजांनुसार याचे महत्व ओळखले होते.