'बजरंगी भाईजान'ची कहाणी प्रत्यक्षात; पाकिस्तानी युवकाच्या बाबतीत काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

  • दोन वर्षांपूर्वी भारतात चुकून आलेल्या युवकाची पाकिस्तानला पाठवणी
  • मुबारकची पाकिस्तानला पाठवणी दोन वर्षांपूर्वी चुकून आला होता भारतात

चंडीगड : अभिनेता सलमान खानच्या "बजरंगी भाईजान' हा चित्रपटाची आठवण व्हावी, अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. पाकिस्तानचा मुबारशर बिवाल ऊर्फ मुबारक या 17 वर्षांच्या युवकाला मंगळवारी भारताने पाकिस्तानच्या ताब्यात दिले. दोन वर्षांनंतर तो त्याच्या कुटुंबात परतणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुबारकने 2018 मध्ये चुकून भारतीय हद्द ओलांडली होती. घरातील सदस्यांबरोबर भांडण झाल्याने त्याने रागाने घर सोडले होते. "मी भटकत असताना भारताच्या हद्दीत पोचल्याचे मला समजले नाही. तेथे मला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पकडले. मी गेले 20-22 महिने भारतात होतो,'' असे त्याने सांगितले. पाकिस्तानमध्ये घरी आई, भाऊ व बहीण असल्याचे तो म्हणाला. मुबारक हा पाकिस्तानमधील कसूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. भारतीय हद्दीत 2018 मध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील खेमकरण येथून "बीएसएफ'ने त्याला ताब्यात घेतले होते. विदेश कायदा आणि पासपोर्ट कायद्यातील तरतुदीनुसार त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. होशियारपूरमधील बालगृहात त्याला ठेवण्यात आले होते. बाल न्याय मंडळाने सप्टेंबर 2018मध्ये त्याला निर्दोष जाहीर केले.

भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

मुबारकची सुटका करून त्याला पाकिस्तानला पाठविण्याच्या मागणीसाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोहीम राबविली होती. त्याच्या सुटकेचा आदेश पाच-सहा दिवसांपूर्वी केंद्राकडून आला होता, अशी माहिती होशियारपूरच्या उपायुक्त इशा कालिया यांनी दिली. होशियापूरमधील बालगृहातून मुबारकची आज सकाळी सात वाजता सुटका करण्यात आली. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी त्याला अटारी-वाघा सीमेवर नेण्यात आले.

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

भारताला पुन्हा भेट देण्याची इच्छा
स्वतःच्या देशात परतणार असल्याचा आनंद मुबारकच्या चेहऱ्यावर दिसत होता. अमृतसरमधील अटारी सीमेवर पत्रकारांशी बोलताना मुबारकने पाकिस्तानमधील कुटुंबात परतत असल्याने खूप आनंद होत असल्याचे सांगितले. भारतीय अधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाल्याचे सांगत त्याबद्दल ऋणी असल्याचे त्याने सांगितले. जर व्हिसा मिळाला तर पुन्हा भारतात येणार का, या प्रश्‍नावर त्याने नक्कीच, असे उत्तर दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story of Bajrangi Bhaijaan is actually happened in India Pakistan Border