Success Story: सेंद्रिय शेतीतून मिळवले एकरी 10 लाखांचं उत्पन्न

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 9 November 2020

सेंद्रिय शेतीचा हा यशस्वी प्रयोग कर्नाटकातील थमैय्या पी. पी. यांनी केला आहे.

म्हैसूर: भारत हा जगभरात कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पण या कृषीप्रधान देशात लाखो शेतकऱ्यांना आजही योग्य सिंचनाची सुविधा नसल्याने जमिनी पडीक पडल्या आहेत. अशातही काही शेतकरी कष्ट आणि योग्य तंत्रज्ञान वापरून कमी जमिनीत लाखो रुपयांचे उत्पन्न काढताना दिसत आहेत. असाच एक प्रयोग कर्नाटकातील थमैय्या पी पी (Thammaiah PP) यांनी केला आहे. 

बहुस्तरीय आणि बहुपिक शेती पद्धत-
थमैय्या पी पी हे 1984 पासून सेंद्रीय शेती (organic farming) करत असून प्रत्येक वेळी त्यांना अपुऱ्या सिंचन व्यवस्थेने आणि दुष्काळाने दगा दिला होता. त्यानंतर म्हैसूरमधील हुंसार तालुक्यातील थमैय्या यांनी शेतीची एक वेगळी आणि अपारंपरिक पद्धत वापरून  बहुस्तरीय शेती (five-layer farming) सुरु केली. या बहुस्तरीय आणि बहुपिक शेती पद्धतीमुळे थमैय्यांना आज लाखोंचा फायदा होत आहे. 

Success Story : २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त केलं टॉप!

10 पटीने उत्पन्न वाढले-
आता 69 वर्षीय थमैय्यांना या शेतीचा मोठा फायदा होत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या वापरात 50 टक्क्यांची कमी झाली असून उत्पन्न दहापटीने वाढले आहे. विशेष म्हणजे त्यांना वार्षिक 10 लाखांचा नफाही राहिला आहे.

विविध पिकांची लागवड-
बहुस्तरीय शेतीच्या माध्यमातून थमैय्या सध्या नारळ, जॅकफ्रूट्स, बाजरी, पालेभाज्या, आंबा, नट, केळी तसेच काळ्या मिरीपर्यंत तब्बल 300 प्रकारच्या वनस्पतींची लागवड करत आहे. थमैय्या यांनी ज्या प्रकारची शेती केली आहे ती मोठी कौतुकास्पद आहे, कारण अशी शेती करणं हे प्रत्येक शेतकऱ्यांचे स्वप्न असतं.

Success Story : २१ व्या वर्षी तो बनला न्यायाधीश!

Five-Layer Farming नेमकी काय आहे?
या शेती पध्दतीत एकाच शेतात वेगवेगळ्या उंचीच्या वनस्पती किंवा पिकं घेतली जातात, जेणेकरून जमिनीचा वापर वाढेल. "ही एक स्वयंपूर्ण शेती पद्धत असून यामध्ये पहिले पीक कापणी होईपर्यंत दुसरे पीक कापण्याच्या तयारीत आहे. या शेतात पिकं एकमेकांच्या जवळ असल्याने एका पिकासाठी लागणारे पाणी दोन किंवा अधिक पिकांसाठी पुरेसं ठरतं. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत होते." अशी माहिती थमैय्या यांनी द बेटर इंडियाला दिली आहे.

योग्य नियोजन आणि कष्टाचं फळ-
सुरुवातीला थमैय्या यांनी त्यांच्या शेतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्याने जमीन मोठ्या प्रमाणात नापिक झाली होती. त्यानंतर थमैय्या यांनी 1984 पासून सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला थमैय्या यांना सेंद्रिय शेतीतही मोठा तोटा होत होता. पण त्यानंतर जिद्द हारली नाही. वारंवार ते प्रयत्न करत राहिले. योग्य नियोजन आणि कष्टाचं फळ त्यांना शेवटी मिळालं आहे. आज या सेंद्रिय बहुपिक पद्धतीचा मोठा फायदा थमैय्या यांना होत आहे. 

थमैय्या यांनी Five-Layer Farming चे सांगितलेले फायदे-
- पाण्याची बचत मोठी होते.
- शेती दाट झाल्याने शेतातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे जमिन ओलावा धरून राहते. 
- ही शेती करण्यास तीन पटीने कमी पाणी लागते
- बहूपिक शेती पद्धतीमुळे नेहमी कोणते ना कोणते पिक कापनीला येत असते आणि पैसाही खेळता राहतो.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story Thammaiah PP organic farming five layer farming Karnataka