
रजनीकांत यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तमिळनाडूच्या सर्व राजकीय पक्षांच्या नजरा रजनीकांत यांच्या निर्णयावर टिकून आहेत.
चेन्नई- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्यानंतर दक्षिण भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान रजनी मक्कल मंद्रमचे प्रमुख रजनीकांत यांनी आज (दि.30) त्यांच्या पक्षाच्या जिल्हा सचिवांची चेन्नईत बैठक बोलावली आहे. रजनीकांत हे बैठकीसाठी आपल्या निवासस्थानाहून रवानाही झाले आहेत. पक्षाच्या आगामी रणनीतिबाबत ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांच्या घोषणेआधीच चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
2021 मध्ये तमिळनाडूत विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तमिळनाडूच्या सर्व राजकीय पक्षांच्या नजरा रजनीकांत यांच्या निर्णयावर टिकून आहेत. आजच्या बैठकीनंतर रजनीकांत हे निवडणूक लढवणार की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान, मंद्रम ही संघटना तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात रुपांतर करण्यासाठी बनवलेली संघटना असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा- भाजपच्या महिला आमदारांचे कोरोनामुळे निधन
रजनीकांत मागील दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या त्यांना राजकारणात प्रवेश केलेला नाही. परंतु, मागील वर्षी अभिनेता कमल हासन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकते असे बोलले जात होते.
हेही वाचा- लसीमुळे आजारी पडल्याचा दावा करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा 100 कोटींचा दावा
यापूर्वी रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या राजकारणात क्रांती आणायची असल्याचे म्हटले होते. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असेही त्यानी स्पष्ट केले होते. गेल्या महिन्यात रजनीकांत यांच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले होते. यामुळे तमिळनाडूतील राजकारणात खळबळ उडाली होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रजनीकात यांचा नियोजित राजकीय प्रवेश टळू शकतो, असे त्यात म्हटले होते. रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर चिंतेत असल्याचे पत्रात म्हटले होते. यामुळे राजकारणात सहभागी होणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. परंतु, रजनीकांत यांनी हे पत्र आपण लिहिले नसल्याचे स्पष्ट केले होते.