खाल्ल्या मिठाला जागा! सुप्रिया सुळेंनी संसदेत सुजय विखेंची घेतली शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule and sujay vikhe

महाविकास आघाडी सरकारचे नेते केंद्राने दिलेल्या निधीबद्दल आभार मानत नाहीत अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती.

खाल्ल्या मिठाला जागा! सुप्रिया सुळेंनी संसदेत सुजय विखेंची घेतली शाळा

नवी दिल्ली - लोकसभेत राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांची शाळा घेतल्याचं गुरुवारी दिसून आलं. सुजय विखे पाटील यांनी केंद्रातील युपीए सरकारच्या कारभारावर आणि राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीकास्र सोडले होते. याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर देताना खाल्ल्या मिठाला जागावं असा टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे पाटील यांना युपीएमध्ये त्यांचे वडीलसुद्धा होते याची आठवण करून दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी आठवण करून देते की, युपीएच्या दोन्ही कार्यकाळात त्यांचे वडील मंत्री होते. तेव्हा जी काही धोरणं मांडली गेली तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांविरोधात टीका केलीय. आमच्या संस्कृतीत हे बसत नाही. मराठीत यासाठी एक म्हणही आहे, खाल्ल्या मिठाला जागावं, आम्ही आयुष्यभर हे लक्षात ठेवण्याची शिकवण मला आईने दिली असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

महाविकास आघाडीवर सुजय विखे पाटील यांनी टीका केली. पंतप्रधानांनी दिलेल्या निधीतून विकास केला, पण महाविकास आघाडीच्या खासदारांनी त्याबदद्ल आभार मानलं नाही. सेवा एकाने करायची आणि मेवा दुसराच खातोय असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला. केंद्राच्या निधीतून विकासकामे केली जातात, उद्घाटने करतात पण त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत नसल्याचं विखे पाटील यांनी संसदेत बोलताना म्हटलं होतं.

हेही वाचा: तो माझा अधिकार! लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना झापलं

खासदार सुजय विखे पाटील यांनी युपीए सरकारच्या दोन्ही कार्यकाळातील कारभारावर जोरदार टीका केली होती. आपण स्वत: सहकार क्षेत्रातून आलो असल्याचं सांगताना ते म्हणाले की, स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत, शेतकऱ्यांचे बळकटीकरण याची सुरुवात सहकारातून झाली आहे. आशियातील पहिला साखर कारखाना सुरु करून विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीला चालना दिली असंही विखे पाटील यांनी संसदेत सांगितलं.

युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कर्ज काढून एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागली. कर्ज घ्या आणि एफआरपी द्या अशा पद्धतीने काम सुरु होते. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद केले. तेच बंद पडलेले साखर कारखाने आज महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी कमी किंमतीत खरेदी करून मालक बनल्याची टीका सुजय विखे पाटील यांनी केली.

Web Title: Supriya Sule Answer To Sujay Vikhe Patil In Lok Sabha Budget Session

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..